रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर पतधोरणानंतरही सर्वप्रथम घरासाठी कर्जाचे व्याजदर कमी करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षांत अधिक गृह कर्ज वितरणाचे लक्ष्य राखले आहे.
२०१४-१५ मध्ये गृह कर्ज वितरणात १४.५ टक्के वाढ राखणाऱ्या स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी तब्बल १८ टक्के वाढीच्या गृह कर्ज वितरणाचे उद्दिष्ट राखले आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बी. श्रीराम यांनी बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले की, बँकांमध्ये व्याजदरयुद्ध पुन्हा सुरू झाले आहे, असे आम्ही मानत नाही. मात्र आगामी कालावधीत गृह कर्ज मागणीत वाढ निश्चित होईल. त्यामुळेच आम्हीही चालू आर्थिक वर्षांत १८ टक्के वाढीची अपेक्षा ठेवली आहे.
स्टेट बँकेचे २०१३-१४ या आर्थिक वर्षांत डिसेंबर २०१४ पर्यंत १,५२,९०५ कोटी रुपयांचे एकूण गृह कर्ज वितरीत केले आहे. वार्षिक तुलनेत यात १३.१५ टक्के वाढ झाली आहे. तर बँकेची स्पर्धक व या क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी लिमिटेडचे याच कालावधीत २,१९,९५१ कोटी रुपये गृह कर्ज वितरण आहे. स्टेट बँकेने सरलेल्या रविवारपासून त्यांच्या गृह कर्ज व्याजदरात ०.१५ टक्क्यांपर्यंत कपात केली. बँकेचा दर आता ९.९० टक्क्यांवर आहे. त्याबरोबर एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेचाही दरही सारखाच ९.९० टक्के आहे. महिला कर्जदारांसाठी स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने ९.८५ टक्के व्याज दराने गृह कर्ज देऊ केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बँकांमार्फत केले जाणाऱ्या गृह कर्ज व्याजदर कपातीमुळे नव्या कर्जदारांना स्वस्तात कर्ज उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर विद्यमान कर्जदारांचा मासिक हप्ताही काही प्रमाणात शिथिल होईल. आमच्या अंदाजाने नजीकच्या कालावधीत कर्ज मागणी २ ते ३ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. २००८-०९ मध्ये व्याजदर ८ ते ९ टक्के असतानाही असेच चित्र होते.
ऋषी मेहरा, सह संस्थापक, डिल्स४लोन्स.कॉम