स्टेट बँकेच्या शुल्कवाढीने गोंधळ | Loksatta

स्टेट बँकेच्या शुल्कवाढीने गोंधळ

जूनपासून मोबाइल वॉलेट व्यवहारांवर शुल्क

स्टेट बँकेच्या शुल्कवाढीने गोंधळ
संग्रहित छायाचित्र

जूनपासून मोबाइल वॉलेट व्यवहारांवर शुल्क

एटीएममधून रक्कम काढण्यावर शुल्क लावण्याच्या चर्चेत स्टेट बँक पुन्हा एकदा घेरली गेली आहे. मात्र असे शुल्क केवळ कंपनीच्या मोबाइल वॅलेटद्वारे काढले जाणाऱ्या व्यवहारांवरच असेल, असे अखेर स्पष्ट करण्यात आले.

स्टेट बँकेचे एसबीआय बडी हे मोबाइल अ‍ॅप आहे. याद्वारे पैसे काढण्याची तसेच पैसे भरण्याची सुविधाही आहे. मात्र अशा प्रत्येक व्यवहारावर येत्या १ जूनपासून २५ रुपयांपर्यंत शुल्क लावण्याचे स्टेट बँकेने जाहीर केले आहे. यामुळे स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क आकारले जाईल, असा समज पसरला. मात्र बँकेने हे शुल्क केवळ अ‍ॅपकरिताच असेल, असे स्पष्ट केले. सर्वसाधारण एटीएमधारकांना शुल्क लागू केले जाणार नाही, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितले. मोबाइल अ‍ॅपकरिता बँक प्रतिनिधीद्वारे (बिझनेस करस्पॉन्डट-बीसी) होणाऱ्या व्यवहारासाठीदेखील किमान २ ते कमाल ८ रुपये असे शुल्क असेल, असेही बँकेने म्हटले आहे. या माध्यमातून मोबाइल अ‍ॅपमध्ये १,००० रुपयांपर्यंत रक्कम भरता येणार आहे, तर २,००० रुपयांपर्यंत काढण्यात येणाऱ्या रकमेवर २.५० रुपयांपर्यंत व्यवहार शुल्क लागू होणार आहे. बँकेचे तिच्या एटीएमद्वारे महिन्याला चार व्यवहार सध्या विनाशुल्क आहेत.

बँकेच्या बचत खात्यातील किमान शिलकीवर शुल्क लावल्यामुळे स्टेट बँक यापूर्वीच चर्चेच्या गर्तेत सापडले आहेत. शहरी भागातील बचत खातेधारकांसाठी किमान रक्कम ५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यातच आता मोबाइल वॅलेटद्वारे होणारे पैसे काढण्याचे अथवा भरण्याचे व्यवहार सशुल्क करण्यात आले आहेत. मात्र यामुळे बँकेच्या ३१ कोटी ग्राहकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-05-2017 at 02:17 IST
Next Story
एटीएमला नोटांचा पुरवठा अद्याप निम्म्यावरच