सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेने वादग्रस्त ठरलेल्या अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या १ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे ६,२०० कोटी रुपये) कर्जाबाबत अद्याप चाचपणी सुरू असल्याचे सांगून त्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याचे संकेत मंगळवारी दिले.
कर्ज वितरणासंबंधी अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आले नसून, मूल्यांकनाचीच प्रक्रिया सुरू आहे, असे बँकेतील या कर्ज प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना, अदानी समूह आणि स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत या इतक्या मोठय़ा कर्जविषयक कराराबाबत सहमती घडून आली.
त्यासंबंधाने देशभरात राजकीय स्तरावर अनेक खरमरीत चर्चा आणि टीकेची झोड उठल्यानंतर, स्टेट बँकेने केवळ कर्जविषयक प्रस्तावाचा स्वीकार करणारे हे सामंजस्य होते, प्रत्यक्ष कर्जमंजुरी नव्हती, असे बँकेने स्पष्ट केले. अदानीला दिलेल्या कर्जावरून बँकेवर टीका झाली होती.