चुणचुणीत, चटकदार..

नववर्षांतील निर्देशांकासाठी सर्वात बहारदार आठवडा सरला. फक्त अपवाद केवळ गुरुवारचा. चीन, जपान या बडय़ा अर्थव्यवस्थांमधील दोषपूर्ण संकेतांपायी वैश्विक बाजार खाली असल्याने

नववर्षांतील निर्देशांकासाठी सर्वात बहारदार आठवडा सरला. फक्त अपवाद केवळ गुरुवारचा. चीन, जपान या बडय़ा अर्थव्यवस्थांमधील दोषपूर्ण संकेतांपायी वैश्विक बाजार खाली असल्याने त्या दिवशी आपल्या बाजाराने घोडदौडीतून उसंत घेतली इतकेच.
अंतरिम अर्थसंकल्पाने वाहन उद्योगाला अबकारी शुल्कात कपातीची भेट दिल्याने वाहन क्षेत्रातील समभागांची चांगली मागणी दिसली. सर्व वाहन उत्पादकांनी किमती लगोलग कमी करून अर्थमंत्र्यांनी दाखविलेल्या कृपेला प्रतिसादही दिला. पण अर्थमंत्र्यांची अशी कृपा अन्य अनेक अरिष्टग्रस्त उद्योगक्षेत्रांबाबत मात्र दिसून आली नाही. जी मंडळी आस लावून बसली होती, त्या सोने-चांदी आभूषण उद्योगाच्या तोंडाला अर्थसंकल्पाने चक्क  पाने पुसली. त्यामुळे आधीच्या आठवडय़ात बळावलेले सराफा समभागांनी सोमवारच्या अर्थसंकल्पानंतर सपाटून मार खाल्ला. बँकांच्या समभागांबाबत वाढते अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) हे अतीव चिंतेचे कारण असले तरी या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान व आवाका पाहता, ते गुंतवणूकदारांच्या भागभांडारात असायलाच हवेत. सरलेल्या आठवडय़ात बँकांच्या समभागांमधील सरशीनेही असाच प्रत्यय दिला आहे.
निर्देशांकांमध्ये समाविष्ट असलेले आघाडीचे अनेक समभाग डळमळत असल्याचे दिसत असले तरी चालू वर्षांच्या सुरुवातीपासून, स्मॉल आणि मिड-कॅप क्षेत्रातील चुणचुणीत, चटकदार समभागांबाबत बाजाराने दाखविलेली आस्था दोन महिने सरत आले तरी कायम आहेत. या दोन महिन्यांत अगदी भाव ५०चा १०० आणि १५० झाल्याचे आपण अनेक समभागांबाबत अनुभवले आहे. या क्रमात फिनोलेक्स इंडस्ट्रिज, बालकृष्ण इंडस्ट्रिज, पॉली मेडिक्युअर, विनाती ऑरगॅनिक्स, मोन्सॅन्टो इंडिया, नाथ बायो-जीन्स, एनआयआयटी टेक, टाटा एलेक्सी, अमरा राजा बॅटरीज्, अपोलो टायर्स, इप्का लॅब्स, माइंड ट्री, परसिंस्टंट सिस्टीम्स, टाटा स्पॉन्ज अ‍ॅण्ड आयर्न या नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या समभागांचा उल्लेख करावाच लागेल. असा काही चटकदार ऐवज गुंतवणुकीला लज्जत देण्यासाठी प्रत्येकाच्या गाठीला थोडाबहुत असावाच.

शिफारस..
एनएसईवर येत्या बुधवार, २६ फेब्रुवारीपासून व्हिक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू होत आहे. बाजारातील वध-घटीपासून बचावाचे एफअ‍ॅण्डओ गुंतवणूकदारांना उपलब्ध झालेले हे उमदे साधन असून, विद्यमान निवडणूक हंगामात ते आजमावून पाहणे नक्कीच उपयुक्त ठरेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी टाटा एलेक्सीवर लक्ष असावे.

बाजार-खल
केजरीवाल यांनी मुकेश अंबानी यांच्याविरोधात पोलिसात दाखल केलेल्या गुन्ह्य़ातून पुढे काय निघेल, काहीतरी निघेलच असेही नाही. पण या बाबीने बाजारावर मात्र परिणाम साधला आहे. अंबानी (दोन्ही बंधू) समूहाच्या समभागांच्या गुंतवणूकदारांनीही या घटनेची दखल घेतल्याने या समभागांचे वध-घटीचे पडसाद उमटले. इतकेच देशातील सर्वच बडय़ा उद्योग घराण्यांमध्ये टाटांचा अपवाद करता, अशीच प्रतिक्रिया दिसून आली. अदानी समूह, टोरेन्ट समूह, जेपी, जिंदल, बिर्ला समूह अशा जवळपास शे-पंचाहत्तर समभागांमधील ही हालचाल म्हणजे राजकारणी व उद्योगांच्या नात्यावरील प्रकाशझोतच ठरतो. आगामी निवडणुका व निकाल येईपर्यंतचे तीन महिने या कंपन्यांच्या भागधारकांसाठी कसोटीचेच राहतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market closed out its best week

ताज्या बातम्या