जागतिक बाजारातील सुरू असलेल्या पडझडीचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर होताना दिसून येत आहेत. आजचा दिवस गुंतवणुकदारांसाठी निराशाजनक असल्याचे दिसत आहे. कारण, आज निफ्टीत ५५० अंकाची आणि सेन्सेक्समध्ये १९०० अंकाची मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. या घसरणीमुळे अर्थसंकलपापूर्वी शेअर बाजारात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे दिसत आहे.

शेअर बाजारात मागील पाच दिवसांपासून घसरण दिसत आहे. मागील आठवड्यात सोमवारी थोडीफार वाढ दिसून आल्यानंतर दररोज शेअर बाजारात घसरणच पाहायला मिळाली. या दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी ३.५० टक्क्यांपर्यंत खाली आले. नव्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास अवघा एक आठवडा उरलेला असताना शेअर बाजारात ही घसरण होताना दिसत आहे. पुढील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण दिसून आली होती, त्यानंतर दुपारच्या सत्रात ही घसरण अधिकच होत गेली. तर, निफ्टीमध्ये o.४४ टक्क्यांनी घसरण होत १७,५५० अंकांवर बाजार सुरू झाला होता.

सेन्सेक्समध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे वर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स निर्देशांक ५८ हजारांच्या खाली आला आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास सेन्सेक्समध्ये १२७१ अंकाची घसरण होती.

जागतिक पातळीवरील महागाईचा भडका आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून अपेक्षेपेक्षा लवकर व्याज दरवाढ केली जाण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटताना दिसत आहेत.