scorecardresearch

विक्रीच्या वादळाचा ‘सेन्सेक्स’ला १,००० अंशांचा फटका

गभरातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक व्याज दरवाढीच्या धोरणामुळे विकासाचे इंजिनही मंदावण्याची भीती आहे.

विक्रीच्या वादळाचा ‘सेन्सेक्स’ला १,००० अंशांचा फटका
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सुरू केलेला व्याज दरवाढीचा सपाटा आणि त्या परिणामी प्रमुख देशांच्या भांडवली बाजारात झालेल्या घसरणीचे तीव्र पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. सप्ताहअखेर सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

जागतिक पडझडीचे अनुकरण झालेल्या समभाग विक्रीमुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,०२०.८० अंशांनी म्हणजेच १.७३ टक्क्यांनी घसरून ५८,०९८.९२ पातळीवर बंद झाला. दिवसातील ५९,१४३.३२ या उच्चांकी पातळीपासून, १,१३७.७७ अंश गमावत सेन्सेक्सने ५७,९८१.९५ या नीचांकी पातळीला गवसणी घातली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३०२.४५ अंशांची म्हणजेच १.७२ टक्क्यांची घसरण झाली आणि तो १७,३२७.३५ पातळीवर स्थिरावला.

दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांवरील परताव्याचा वाढता दर आणि डॉलर निर्देशांक वधारल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा उदयोन्मुख बाजारांकडे पाठ फिरविल्याचे दिसते. बँकिंग प्रणालीतील कमी झालेली तरलता, कमकुवत रुपया आणि वाढलेल्या बाजार मूल्यांकनामुळे नजीकच्या काळात बाजारात मंदीवाल्यांचा पगडा राहण्याचे संकेत आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक व्याज दरवाढीच्या धोरणामुळे विकासाचे इंजिनही मंदावण्याची भीती आहे. मात्र त्या तुलनेत देशांतर्गत आघाडीवर वाढते महसुली उत्पन्न आणि पतपुरवठय़ाची वाढती मागणी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक चित्र दाखवत आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत परिस्थिती स्थिरावण्याची वाट पाहायला हवी, असा सल्ला जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर यांनी दिला.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिडच्या समभागात ७.९३ टक्क्यांनी सर्वाधिक पडझड झाली. त्यापाठोपाठ महिंद्र अँड मिहद्र, स्टेट बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज फायनान्स, एनटीपीसी, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण झाली. तर सन फार्मा, टाटा स्टील आणि आयटीसीचे समभाग किंचित वाढीसह स्थिरावले.

बाजार घसरणीची मुख्य कारणे

* ‘फेड’ची आक्रमक भूमिका : अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ केली. विश्लेषकांच्या मते, फेड नोव्हेंबरमध्ये आणखी पाऊण टक्के, डिसेंबरमध्ये अर्धा टक्के आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ करू शकेल.

* रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाकडे लक्ष : बाजार विश्लेषकांचे आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याकडे लक्ष लागले आहे. सध्या रिझव्‍‌र्ह बँकेकडून रुपयाला सावरण्यासाठीचे प्रयत्न आणि परकीय गंगाजळीला लागलेली ओहोटी कमी करण्यासाठी काय योजना केल्या जातील याबाबत चर्चा सुरू आहे. यातून एप्रिल २०२३ पर्यंत रेपोदर ६.७५ टक्क्यांपर्यंत वाढविला जाण्याचे कयास व्यक्त होत आहेत.

* तरलतेचा अभाव : बँकिंग प्रणालीतील तरलता गेल्या ४० महिन्यांत प्रथमच तुटीत गेली. बाजारात तरलता राखण्यासाठी, रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी ५०,००० कोटी रुपयांच्या व्हेरिएबल रेट रेपो (व्हीआरआर) लिलावाचे आयोजन केले. आगाऊ करभरणा, कर्जाच्या मागणीत वाढ आणि ठेवींच्या वाढीचा वेग कमी झाल्यामुळे ही तरलता शोषली गेल्याचे विश्लेषकांनी सांगितले. येत्या सणासुदीच्या हंगामात निधीची मागणी वाढून, रोकडसुलभतेची चणचण वाढणे अपेक्षित आहे.

* विकासदराच्या अंदाजात कपात : जगभरातील प्रमुख पतमानांकन संस्थांनी देशाच्या विकासदराच्या अंदाजात घट केली आहे. आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज घटवून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तो पूर्वानुमानित ७.२ टक्क्यांऐवजी ७ टक्क्यांपर्यंत सीमित राहील असे स्पष्ट केले. ‘फिच रेटिंग्ज’नेदेखील चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीसंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ७.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. तर मॉर्गन स्टॅन्ले आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अंदाजात ०.४० टक्क्यांची कपात करत तो ६.८ टक्के राहील असे म्हटले आहे. सिटीग्रुपने तो ८ टक्क्यांवरून कमी करत थेट ६.७ पर्यंत खालावण्याचे अंदाजले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या