मुंबई : मध्यवर्ती बँकेकडून व्याज दरात थेट अर्ध्या टक्क्याची दशकभरातील मोठी वाढ करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रात सकारात्मक पातळीवर व्यवहार करणाऱ्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये बुधवारी उत्तरार्धात व्यवहारात वाढलेल्या विक्रीमुळे २१५ अंशांची घसरण झाली. निर्देशांकात सलग चौथ्या सत्रात घसरण झाली असली तरी व्याज दराबाबत संवेदनशील बांधकाम क्षेत्र, वाहन कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये वाढ-घटीचे संमिश्र चित्र होते.
रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई चढत्या भाजणीचा अंदाज कायम ठेवत चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज ७.२ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१४.८५ अंशांच्या घसरणीसह ५४,८९२.४९ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील कामकाजात सेन्सेक्सने ५५,४२३.९७ पातळीच्या उच्चांकाला स्पर्श केला. तर ५४,६८३.३० चा तळ गाठला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६०.१० अंशांची घसरण झाली आणि तो १६,३५६.२५ पातळीवर स्थिरावला.
रिझव्र्ह बँकेने वाढत्या महागाईचे गांभीर्य ओळखत त्यानुसार पावले टाकली आहेत. चालू आर्थिक वर्षांसाठी रिझव्र्ह बँकेने वर्तविलेला ७.२ टक्के विकासदर आणि ६.७ टक्के चलनवाढीचा अंदाज वास्तववादी धोरणाला प्रतििबबित करतो. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात केलेली थेट अर्ध्या टक्क्याची वाढ म्हणजे रिझव्र्ह बँक महागाईवर जलदगतीने नियंत्रण मिळवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे निदर्शक आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे मुख्य रणनीतीकार व्ही के विजयकुमार यांनी व्यक्त केले.
बँकांच्या समभागात स्टेट बँक १.६६ टक्के, बँक ऑफ बडोदा १.५७ टक्के, बंधन बँक १.०४ टक्के तर एचडीएफसी बँक ०.३३ टक्के असे वाढले. वाहन उद्योगातील मारुती १.०८ टक्के, टीव्हीएस मोटर ०,,८७ टक्के, हीरो मोटोकॉर्प ०.६७ टक्के आणि मिहद्र अँड मिहद्रचा समभाग ०.३६ टक्के अशी वाढ साधणारे समभाग ठरले.
सेन्सेक्समध्ये सहभागी टाटा स्टील, डॉ. रेड्डीज, बजाज फायनान्स, टीसीएस आणि टायटनच्या समभागात तेजी होती. त्याउलट भारती एअरटेल, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक मिहद्र बँकेच्या समभागात घसरण झाली.