मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत पातळीवर बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांमध्ये आलेल्या खरेदी जोरावर भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सोमवारी पुन्हा एकदा ६० हजारांची पातळी सर केली. सलग तिसऱ्या सत्रात तेजीची दौड कायम असून तीन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने २ टक्क्यांची वाढ नोंदवली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२१.९९ अंशांनी म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वधारून ६०,११५.१३ या तीन आठवडय़ांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला, निर्देशांकातील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २१ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात ६०,२८४.५५ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर निर्देशांकाने ५९,९१२.२९ हा तळ पाहिला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १०३ अंशांची (०.५८ टक्के) भर घातली आणि तो दिवसअखेर १७,९३६.३५ पातळीवर स्थिरावला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी, खनिज तेलाच्या थंडावलेल्या किमती आणि अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याच्या संकेतामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याचबरोबर अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने पुन्हा एकदा आक्रमक दरवाढीचे सूतोवाच केले आहे. मात्र दरवाढ बाजाराने आधीच गृहीत धरल्याने जागतिक पातळीवरील भांडवली बाजारांमध्ये देखील तेजीवाल्यांचा जोर कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

मुंबई शेअर बाजारात टायटनचा समभाग २.३९ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक, टेक मिहद्र आणि टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागांनी निर्देशांक वाढीला चालना दिली. दुसरीकडे एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि नेस्लेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

एफआयआयकडून ५,६०० कोटींची समभाग खरेदी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) चालू सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ५,६०० कोटी रुपये मूल्यांच्या समभागांची खरेदी केली. देशातील सणासुदीचा हंगाम बघता ग्राहक खर्चातील अपेक्षित वाढ आणि इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेशी संबंधित सकारात्मक आकडेवारीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजाराकडे मोर्चा वळविला आहे. एनएसडीएलच्या  आकडेवारीनुसार, ‘एफआयआय’कडून ऑगस्टमध्ये तब्बल ५१,२०० कोटी रुपये आणि जुलैमध्ये सुमारे ५,००० कोटी रुपयांची नक्त समभाग खरेदी करण्यात आली.