मुंबई : भांडवली बाजारावर सप्ताहारंभी तेजीवाल्यांनी पकड घट्ट करत चार दिवसांच्या घसरणीला लगाम लावला. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर बँकिंग समभागांमध्ये वाढलेल्या खरेदीने सेन्सेक्स व निफ्टीला बळ मिळाले.

सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स १४५.४३ अंशांच्या वाढीसह ६०,९६७.०५ वर बंद झाला. मात्र निर्देशांकाला ६१,००० पातळीपुढे मजल मारण्यास अपयश आले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीने १०.५ अंशांची किरकोळ वाढ नोंदविली. निफ्टी १८,१२५.४० अंशांवर व्यवहार करत स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बॅंकेचा समभाग दिवसभर चर्चेत राहिला, बँकेने शनिवारी जाहीर केलेल्या सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी करत ५,५११ कोटींच्या नफ्याची नोंद केली. परिणामी सोमवारी समभाग १०.८५ टक्कय़ांनी वधारून ८४१.७० रुपयांवर बंद झाला. याचबरोबर अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज, स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, सन फार्मा आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग प्रत्येकी ३.४५ टक्कय़ांपर्यंत वधारले. ‘रेलिगेअर ब्रोकिंग’च्या संशोधन विभागाचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांच्या मते, खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक बँक मंगळवारी (२६ ऑक्टोबर) तिमाही वित्तीय कामगिरी जाहीर करणार आहेत. त्यामुळे बाजारात काही दिवस बँकिंग क्षेत्रावर प्रकाशझोत राहणार आहे. निफ्टी १७,९५० अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर टिकून राहिल्यास बाजारात वाढ होईल. अन्यथा ही पातळी मोडल्यास बाजारात पुन्हा नफावसुलीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. बाजारात एक निश्चित कल दिसून येत नाही तोवर गुंतवणुकीत सावधगिरी हवी.