मुंबई : करोनाचा नवीन उत्परिवर्तित विषाणू ‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य उद्रेकाने जगभरातील गुंतवणूकदार बिथरलेले असतानाही, सोमवारी निर्देशांकांनी वाढीसह सप्ताहाची सकारात्मक सुरुवात केली. रिलायन्स इंडस्ट्रीजसह, बँक आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांना मिळालेल्या मागणीने निर्देशांकांना कमाईसह दिवसाची अखेर करता आली.

नवीन उत्परिवर्तित विषाणूचा विविध देशांमधील फैलाव पाहता, जगभरात अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध घालण्यासह, विदेशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्यासंबंधी कठोर निर्बंध लागू केले आहेत. शुक्रवारी याचे सावट म्हणून भारतासह जगातील सर्वच भांडवली बाजारात मोठय़ा पडझडीने गुंतवणूकदारांमध्ये हाहा:कार उडवून दिला होता. नवीन विषाणूची बाधा झालेल्या एकाही रुग्णाची नोंद भारतात सध्या तरी झालेली नाही.

शुक्रवारच्या भयानक घसरणीपश्चात, सोमवारी सकाळचा सत्रारंभ जगभरातील अन्य बाजारांतील कलाचे अनुकरण करीत सेन्सेक्सच्या ५०० हून अधिक अंशांच्या आपटीनेच झाला. तथापि उत्तरार्धात समभागांची खरेदी वाढल्याने ही घसरण भरून निघाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दिवसाची अखेर १५३.४३ अंशांची वाढ नोंदवत, ५७,२६०.५८ या पातळीवर केली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकानेही शुक्रवारच्या बंद पातळीत २७.५० अंशांची भर घालत, १७,०५३.९५ या पातळीवर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला.

‘एलआयसी’ला खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेत १० टक्क्य़ांपर्यंत भागभांडवली हिस्सा वाढविण्याला रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली. याचा परिणाम म्हणून बँकेच्या समभागांना मागणी मिळून त्यात २.९२ टक्क्य़ांची मोठी मूल्यवाढही झाली. रिलायन्स जिओने येत्या १ डिसेंबरपासून प्रीपेड दरांमध्ये वाढ करण्याची घोषणेचा सकारात्मक परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग मूल्याने १.२६ टक्क्य़ांची उसळी घेतली.

तिमाहीच्या जीडीपीआकडेवारीवर लक्ष

येत्या काळातील अनिश्चिततेला गृहीत धरून, जागतिक बाजारांनी संमिश्र स्वरूपाच कल सोमवारी दाखवून दिला. त्या बरोबरीने देशांतर्गत आघाडीवर, मंगळवारी जाहीर होणारी सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीची जुलै ते सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी, नोव्हेंबरची वाहन विक्रीची आकडेवारी, प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या वाढीचे आकडे अशी महत्त्वाची अर्थ-आकडेवारी ही या अस्थिरतेत आणखीच भर घालेल. त्यामुळे तूर्त सावधगिरीच्या भूमिकेचे अनुसरण करीत, गुंतवणूकदारांनी शक्य तितका बचावात्मक पवित्रा घेणे महत्त्वाचे ठरेल, असे रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा यांनी सूचित केले.