नफारूपी विक्रीने निर्देशांक गडगडले ! ; निफ्टीची १८ हजारांखाली लोळण; सेन्सेक्समध्ये ३९६ अंश घसरण

बडय़ा समभागांमध्ये वरच्या पातळीवर नफावसुलीसाठी झालेली जोरदार विक्री हे मंगळवारच्या व्यवहाराचे वैशिष्टय़ ठरले.

मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि निर्देशांकातील वजनदार स्थान असणाऱ्या रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेच्या समभागांची नफ्यासाठी झालेल्या विक्रीने सेन्सेक्समध्ये मंगळवारी ३९६ अंशांची घसरण झाली, तर निफ्टी निर्देशांक पुन्हा १८ हजारांखाली रोडावला. बाजार मूल्यांकनाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वार्तापत्रातील चिंतातुर सुराने खरेदी उत्साहावर पाणी फेरले.

बडय़ा समभागांमध्ये वरच्या पातळीवर नफावसुलीसाठी झालेली जोरदार विक्री हे मंगळवारच्या व्यवहाराचे वैशिष्टय़ ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने २.५१ टक्क्य़ांची, त्यापाठोपाठ स्टेट बँक (२.३१ टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (२.२ टक्के), एनटीपीसी (२.०८ टक्के), इंडसइंड बँक (१.८ टक्के ), सन फार्माच्या (१.५१ टक्के) आणि आयसीआयसीआय बँक (१.२ टक्के) या आघाडीच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे, मारुतीचा समभाग ७ टक्के वाढीसह आघाडीवर होता. त्याचबरोबर महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि बजाज फिनसव्‍‌र्हच्या समभागात तेजी होती.

परिणामी, मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ३९६.३४ अंशांची घसरण होत, तो ६०,३२२.३७ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीमध्ये ११०.२५ अंशांची घसरण झाली. हा निर्देशांक दिवसअखेर १७,९९९.२० पातळीवर स्थिरावला.

क्षेत्रीय पातळीवर ऊ र्जा, इंधन आणि वायू, बँकेक्स, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि वित्त निर्देशांकात प्रत्येकी २.१२ टक्क्य़ांची घसरण झाली. तर भांडवली वस्तू, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक तेजी दर्शवीत होते.

सकाळच्या सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात संमिश्र व्यवहार सुरू होते. मात्र बँकिंग आणि आरोग्य सेवा कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात विक्रीचा मारा सुरू झाल्याने निर्देशांकातील घसरण वाढली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियतकालिक वार्तापत्रात भांडवली बाजाराच्या मूल्यांकनावर व्यक्त केलेल्या चिंतेचा बाजारातील उत्साहावर विपरीत परिणाम साधला, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी निरीक्षण नोंदविले. जागतिक पातळीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या दरम्यान सकारात्मक चर्चा होऊन दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचे निश्चित केल्याने याचे जागतिक बाजारपेठेत संमिश्र पडसाद उमटले. आगामी काळात युरोझोनमधील तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन आकडेवारी आणि अमेरिकेची किरकोळ विक्रीसंबंधित आकडेवारी जाहीर होणार असल्याने युरोपीय आणि अमेरिकी बाजारात संथ व्यवहार सुरू होते, असे नायर यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market update sensex tumbles 396 points nifty slips below 18000 zws

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या