मुंबई : सलग पाच सत्रांतील घसरणीला विराम देत भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी सकारात्मक वाढ साधली. मुख्यत: युरोपीय बाजारातील अनुकूल कलामुळे निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या मारुती, अ‍ॅक्सिस बँक आणि स्टेट बँकेच्या समभागात झालेल्या खरेदीमुळे निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध पवित्रा कायम ठेवून आहेत. याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धसदृश तणाव, वाढती महागाई आणि विदेशी गुंतवणूकदारांचे निर्गमन हे नजीकच्या काळात इतर जोखीम घटक ठरतील.

सकाळच्या सत्रात व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ५६,४०९.६३ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १७,००० अंशांची पातळी मोडत १६,८३६.८० अंशांचा दिवसभरातील तळ गाठला होता. मंगळवारचा व्यवहार मोठय़ा पडझडीचा राहील असे दिसत असताना, सत्राच्या उत्तरार्धात मुख्यत: युरोपीय बाजारातील सकारात्मक कल पाहून स्थानिक बाजारात समभाग खरेदीला जोर चढला. परिणामी, दिवसअखेर सेन्सेक्स ३६६.६४ अंशांनी वधारून ५७,८५८.१५ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये १२८.८५ अंशांची भर पडली आणि तो १७,२७७.९५ पातळीवर दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये मारुतीचा समभाग ६.८३ टक्के वाढीसह आघाडीवर होता. समभागाने मंगळवारच्या सत्रात ८,६६४ रुपयांची आतापर्यंतच्या उच्चांकी पातळी गाठली.  त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि एनटीपीसीच्या समभागांनी तेजी दर्शविली. दुसरीकडे एचडीएफसी बँक, विप्रो, बजाज फिनसव्‍‌र्ह, एचडीएफसी आणि रिलायन्सच्या समभागातील घसरण ही गुंतवणूकदारांसाठी निराशादायी ठरली. 

खनिज तेलाच्या दरातील घसरण, फेड धोरणाबाबत अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे पाश्चिमात्य बाजार सावरले, त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. गुंतवणूकदार आता फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीत होणाऱ्या व्याजदर वाढीबाबतच्या संभाव्य निर्णयाची वाट पाहात आहेत. परिणामी बाजारात आणखी काही सत्रांत अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

विदेशी गुंतवणूक माघारी 

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) भांडवली बाजारात विक्रीचा मारा कायम आहे. शेअर बाजाराकडून उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, सोमवारच्या सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी ३,७५१.५८ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, जे सोमवारच्या निर्देशांकातील मोठय़ा पडझडीला हातभार लावणारे ठरले.