मुंबई : वाढत्या महागाईचा दबाव आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीच्या निरंतर निर्गमनामुळे बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजारावर मंदीवाल्यांचे पारडे जड राहिले. याचबरोबर कमकुवत रुपया आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे सकाळच्या सत्रातील वाढ निर्देशांकांनी गमावली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २३७.४४ (०.४१) अंश घसरण होऊन ५८,३३८.९३ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५४.६५ (०.३१ टक्के) अंशांची घसरण झाली. तो १७,४७५.६५ पातळीवर स्थिरावला.

 कंपन्यांच्या कमाईच्या हंगामाची सुरुवात, चलनवाढीची आकडेवारी आणि युरोपीय सेंट्रल बँकेच्या आगामी पतधोरणच्या पार्श्वभूमीवर चालू आठवडय़ात बाजाराला गती मिळाली. मात्र महागाईचा उच्चांक आणि मध्यवर्ती बँकांकडून महागाई नियंत्रणासाठी आक्रमकपणे व्याजदर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले आहे. किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराने मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचत १७ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. मात्र वस्तूंच्या किमती आणि पुरवठय़ात सुधारणा होण्याच्या आशेने भविष्यात महागाईची झळ कमी होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात प्रत्येकी २.०१ आणि १.९० टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ मारुती, डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, पॉवर ग्रीड, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि कोटक बँकेच्या समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे आयटीसी, सन फार्मा, हिंदूस्तान युनिलिव्हर लिमिटेड, स्टेट बँक, एनटीपीसी आणि बजाज फायनान्सचे समभाग प्रत्येकी १.८७ टक्क्यांची तेजी दर्शवीत होते.

दोन दिवस बाजारातील व्यवहार बंद

गुरुवारी महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. तर त्याला जोडून शनिवार आणि रविवार आल्याने सलग चार दिवस भांडवली बाजारात कामकाज होणार नाही.