झपाटय़ाने विस्तारत असलेल्या औषधांच्या ऑनलाइन विक्री करणाऱ्या ई-फार्मसीविरोधात पारंपरिक औषध विक्रेत्यांनी दंड थोपटले असून येत्या १४ ऑक्टोबरला त्या विरोधात देशव्यापी बंदची हाक दिली आहे. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेता येणारी व धोकादायक मानली गेलेली प्रतिजैविके, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, गुंगीचे सिरप यांची बेकायदेशीररीत्या सर्रास होणाऱ्या ऑनलाइन विक्रीकडे प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल असल्याचे बंदची हाक देणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.
सामान्य ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बेकायदेशीर ई-व्यापाराचे धोके प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिले गेले. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेच, उलट ई-फार्मसीला मान्यता देणारी योजना आखली जात असल्यामुळे औषध विक्रेत्यांना आंदोलनात्मक भूमिका घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही, असे औषध विक्रेत्यांची अखिल भारतीय संघटना ‘एआयओसीडी’चे अध्यक्ष जगन्नाथ िशदे यांनी सांगितले. देशभरातून ८ लाख औषध विक्रेते तर राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली.
सक्षम प्रशासकीय यंत्रणा व नियमनाचा अभाव असताना, केवळ प्रगत देशांचे अनुकरण करून ऑनलाइन औषध विक्रीला विधीवत मान्यता देण्याचे अनेक गंभीर परिणाम दिसून येतील.
एकीकडे निकृष्ट, बनावट तसेच अप्रमाणित औषधांचा या व्यवसायात शिरकाव होईल. नको त्या औषधांचे भलत्या कारणासाठी सेवन व गैरवापराचा धोका आहेच, पण या परिणामी जेथे गरज आहे त्या भागात जीवरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती शिंदे यांनी व्यक्त केली.