पीटीआय, नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांतील प्रथम महिना एप्रिलमध्ये देशातून झालेल्या निर्यातीत गत वर्षांच्या तुलनेत २४.२२ टक्क्यांची वाढ होऊन, ती ३८.१९ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम उत्पादने, विद्युत सामान आणि रसायने यांसारख्या प्रमुख क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीमुळे निर्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत वधारली आहे. मात्र आधीच्या मार्च महिन्यात निर्यातीने ४२.२२ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला होता. दुसरीकडे एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवांची आयातदेखील २६.५५ टक्क्यांनी वाढून ५८.२६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे दोहोंतील तफावत अर्थात व्यापार तूट २०.०७ अब्ज डॉलरवर गेली आहे. जी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात १५.२९ अब्ज डॉलर राहिली होती.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर १०० डॉलर प्रतिपिंप पातळीवर कायम आहे आणि त्या परिणामी एकूण आयातीमध्ये पेट्रोलियम पदार्थ आणि खनिज तेलाचा वाटा ३३.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सरलेल्या एप्रिल महिन्यात १९.५१ अब्ज डॉलर मूल्याचे खनिज तेल आणि त्या श्रेणीतील वस्तूंची आयात करण्यात आली. ज्यात वार्षिक आधारावर ८१.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

निर्यातीच्या आघाडीवर

निर्यातीच्या आघाडीवर ९.२० अब्ज डॉलरच्या अभियांत्रिकी वस्तू परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२१ च्या तुलनेत त्यात १५.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. जगातील विकसित राष्ट्रांमधील ऊर्जाविषयक संकट आणि वाढलेल्या किमतींचा भारताच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीलाही मदत झाली आहे. ती ११३.२ टक्क्यांनी वाढून ७.७३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

कोळसा आयात महागली !

जागतिक पातळीवरील महागाई वाढीमुळे कोळसा आयातदेखील महागली आहे. एप्रिलमध्ये ४.७४ अब्ज किमतीचा कोळसा, कोक आणि ब्रिकेट्सची आयात करण्यात आली, जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १३६.४ टक्क्यांनी अधिक आहे. दुसरीकडे सोन्याच्या आयातीत ७३ टक्क्यांची घसरण होत ती १.६९ अब्ज डॉलरवर उतरली आहे.