मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आगामी पतधोरणात व्याजदराच्या स्थैर्यतेचे संकेत दिल्यानंतर आशियाई भांडवली बाजारात उत्साह संचारला. परिणामी येथील प्रमुख निर्देशांकातही गुरुवारी महिन्यातील वायदापूर्दीच्या अखेरच्या सत्रात तेजी नोंदली गेली.

सलग तीन व्यवहारांतील घसरणीला या रूपाने गुरुवारी विराम मिळाला. डॉलरच्या तुलनेत रुपयातील भक्कमतेनेही बाजारातील तेजीला हातभार लावला. दोन्ही प्रमुख निर्देशांक बुधवारच्या तुलनेत अर्ध्या टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्स २०९.३६ अंश वाढीने ५२,६५३.०७ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६९.०५ अंश वाढीसह १५,७७८.४५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील सर्वाधिक ७ टक्क्यांनी उंचावला. तसेच बजाज फिनसव्र्ह, स्टेट बँक, एचसीएल टेक, सन फार्मा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रिज आदीही वाढले. मारुती सुझुकी, पॉवरग्रिड, बजाज ऑटो, आयटीसी, डॉ. रेड्डीज्, हिंदुस्थान यूनिलिव्हर मात्र २.२१ टक्क्यांपर्यंत घसरले.

पोलाद, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता आदी क्षेत्रीय निर्देशांक ५.५४ टक्के वाढीसह तेजीत राहिले. तर दूरसंचार, ऊर्जा, तेल व वायू, आरोग्यनिगा निर्देशांक काही प्रमाणात घसरले. मुंबई शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचे मिड कॅप व स्मॉल कॅप मात्र प्रत्येकी जवळपास एक टक्क्यांनी वाढले.