मुंबई : जागतिक पातळीवर सकारात्मक कल असूनही मंगळवारी स्थानिक बाजारात नफावसुलीने प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक योगदान असलेल्या एचडीएफसी समूहातील दोन्ही कंपन्या, कोटक बँक आणि बजाज फायनान्समधील घसरणीतून सेन्सेक्सने मंगळवारी ११२ अंश गमावले.

दिवसभरातील अस्थिर व्यवहार सत्रानंतर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११२.१६ अंशांनी घसरून ६०,४३३.४५ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४.३० अंशांची घसरण झाली आणि तो १८,०४४.२५ पातळीवर स्थिरावला.

सकारात्मक सुरुवातीनंतर दुपारच्या सत्रात खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागात घसरण झाल्यामुळे भांडवली बाजाराने नकारात्मक पातळीत प्रवेश केला. बहुप्रतीक्षित पायाभूत सुविधा विधेयक मंजूर होऊनही, अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी प्रसिद्ध होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. परिणामी अमेरिकी बाजारात मर्यादित वाढ झाली, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत व्यक्त केले.