मुंबई : जागतिक बाजाराच्या कलाला अनुसरून भांडवली बाजाराने गुरुवारी तेजीची वाट धरली. काहीशा सावरलेल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या बळकटीने बाजारात सकारात्मक खरेदीला चालना दिली. रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाबाबतही उत्सुकता दिसून आली. तेजीवाल्यांनी सुस्पष्ट सरशी साधलेल्या भांडवली बाजारात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ४८८.१० अंशांनी वधारून ५९,६७७.८३ पातळीवर बंद झाला. तर बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक – निफ्टीमध्ये १४४.३५ अंशांची वाढ होत १७,७९०.३५ वर स्थिरावला.