मुंबई : अर्थव्यवस्थेत उभारी दर्शविणारी सकारात्मक आकडेवारी आणि एचडीएफसीसह, आयआरसीटीसी व अन्य प्रमुख कंपन्यांच्या तिमाहीतील सरस कामगिरीमुळे सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी भांडवली बाजारात खरेदी चैतन्य निर्माण झाले. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६०,००० अंशांच्या पातळी पुन्हा कमावताना दिसला. 

सोमवारच्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’ ८३१.५३ अंशांनी झेपावून दिवसअखेरीस ६०,१३८.४६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २५८ अंशांची वाढ झाली. तो १७,९२९.६५ पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ७.४६ टक्क्यांच्या वाढीसह अग्रेसर राहिला. क्षेत्रीय पातळीवर सर्व निर्देशांक दमदार वाढले. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही १.७९ टक्क्यांपर्यंत वधारले.