scorecardresearch

‘सेन्सेक्स’ला ५८१ अंश गळती

गुरुवारी सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ५६,४३९.३६ अंशांचा तळ गाठला होता. तर ५७,५०८.६१ ही त्याची दिवसभरातील उच्चांकी पातळी होती.

मुंबई : अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मार्चपासून व्याज दरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर गुरुवारी जगभरातील भांडवली बाजारांवर त्याचे प्रतिकूल पडसाद उमटले. स्थानिक भांडवली बाजारात याच धास्तीने झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात एक टक्क्यांपर्यंत घसरण झाली. रशिया-युक्रेन युद्ध तणाव आंतरराष्ट्रीय बाजारात पिंपामागे ९० डॉलपर्यंत कडाडलेल्या खनिज तेलाच्या किमतीनेही गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण केली आहे.

गुरुवारी सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ५६,४३९.३६ अंशांचा तळ गाठला होता. तर ५७,५०८.६१ ही त्याची दिवसभरातील उच्चांकी पातळी होती. तब्बल एक हजार अंशांच्या फरकाने वर-खाली हेलकावे दाखविणारी मोठी अस्थिरता निर्देशांकाने गुरुवारच्या सत्रात दाखविली. दिवसांतील उच्चांकी पातळीपासून नीचांकापर्यंत १०६९ अंशांचा प्रवास सेन्सेक्सने केला. दिवसअखेर हा निर्देशांक ५८१.२१ अंशांच्या घसरणीसह ५७,२७६.९४ पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये १६७.८० अंशांची घसरण झाली आणि तो १७,११०.१५ पातळीवर दिवसाअंती स्थिरावलेला दिसून आला.

फेडने महागाईशी लढण्यासाठी व्याजदर वाढवण्यास पुरेसा वाव आहे असे म्हणत बुधवारी व्याज दरवाढीचे संकेत दिले. इतकेच नव्हे तर मार्चपासून पुढे प्रत्येक बैठकीत ०.२५ टक्के दरवाढ अपरिहार्य ठरेल, असेही म्हटले. अमेरिकेतील व्याज दरवाढीनंतर भारतासह उदयोन्मुख बाजारपेठेतून विदेशी गुंतवणुकीचा ओघ बाहेर पडण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीही भू-राजकीय तणावामुळे वाढत असून, त्या परिणामी भडकणारी महागाईही जगभरातील गुंतवणूकदारांना सतावणारी बाब बनली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunsex nifty share market index akp 94

ताज्या बातम्या