मुंबई : भांडवली बाजारात एकंदर सुस्तीच्या वातावरणात, बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ उच्चांकी पातळीला स्पर्श करून माघारी फिरला आणि घसरणीसह बंद झाला. त्या उलट निफ्टी निर्देशांकाने सकारात्मक शेवट केला.

सेन्सेक्सने बुधवारी ५६,१९८ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र दिवसअखेर सेन्सेक्स १४.७७ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ५५,९४४.२१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १६,६३४.६५ अंशांच्या पातळीवर बंद झाला. त्यात १०.०५ अंशांची वाढ झाली. निफ्टीने दिवसातील व्यवहारात १६,७१२.४५ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली.

सेन्सेक्समध्ये टीसीएसचा समभाग सर्वाधिक वधारला. त्यापाठोपाठ इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया आणि आयटीसीचे समभाग तेजीसह बंद झाले. तर बजाज फिनसव्र्ह, टायटन, मारुती, भारती एअरटेल आणि टाटा स्टीलच्या समभागांमध्ये घसरण झाली.

वायदे कराराची मुदत समाप्ती समीप असल्याने देशांतर्गत भांडवली बाजार दिवसभर एकाच मर्यादित पातळीत रेंगाळत होता. क्षेत्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वगळता बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

‘टीसीएस’ची झेप

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसच्या (टीसीएस) समभागाने बुधवारी ३,६९७ रुपयांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. परिणामी कंपनीचे बाजार भांडवल १३.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर सर्वाधिक बाजार भांडवल असणारी टीसीएस देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. बुधवारी तिचे बाजार भांडवल १३,५३,४८२ कोटी रुपयांवर पोहोचले. दिवसअखेर ‘टीसीएस’चा समभाग ४७.३० रुपयांनी वधारून ३६५९ रुपयांवर स्थिरावला.