गुंतवणूकदारांचे पैसे परत फेडण्यासाठी रकमेची जुळवाजुळव करता यावी म्हणून सुब्रतो रॉय यांना घरातच नजरकैदेत ठेवावे, ही सहाराची मागणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी धुडकावून लावली. यामुळे नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगातील त्यांचा ४ मार्चपासून सुरू असलेला मुक्काम लांबला आहे.
यापूर्वी आजारी आईच्या देखभालीसाठी रॉय यांना घरातच नजरकैदेत ठेवण्याची मागणी सहाराच्या वकिलांनी केली होती. सहाराचे वकील राम जेठमलानी यांनी न्या. के. एस. राधाकृष्णन, जे. एस. खेहर यांच्या खंडपीठापुढे निधी तजविज करण्यासाठी रॉय यांना घरातच बंदी ठेवावे, ही मागणी नव्याने केली.
तुरुंगात असताना रॉय यांना गुंतवणूकदारांना द्यावयाच्या रकमेची जुळवाजुळव करणे शक्य नाही; त्यामुळे त्यांना घर अथवा कार्यालयातच नजरकैदेत ठेवावे अशी मागणी जेठमलानी यांनी केली. कोणत्याही न्यायालयाला रॉय यांना एक गुन्हेगार म्हणून तुरुंगात डांबण्याचा अधिकार नाही; न्यायालयाच्या उन्हाळी सुटय़ा जवळ येत आहेत, तेव्हा समूहाच्या अडचणीत आणखी भर पडेल, असे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले.
यावर रॉय हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, असे स्पष्ट करत न्यायालयाने रॉय यांना अद्याप कोणतीही शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही, असेही नमूद केले. कोणतीही शिक्षा जाहीर केली असती तर ते तुरुंगात आहेत, असे म्हणणे सार्थ ठरले असते, असेही न्यायालय म्हणते.
रॉय यांना तुरुंगात कोणालाही भेटता येत नाही; एवढेच काय आंतरराष्ट्रीय खरेदीदारांबरोबर व्यवहारही करता येत नसल्यामुळे रॉय यांच्या तुरुगांतील वास्तव्यामुळे सहारा समूहासमोरील अडचणी बिकट होत चालल्या आहेत, असा युक्तिवाद यावेळी सहाराच्या वकिलांनी केला. मात्र यावर केवळ ‘याची आम्ही दखल घेऊ’ असे म्हणत न्यायालयाने कोणताही निर्णय न दिला नाही.
तिहार तुरुंगाची क्षमता ५०० कैदी सामावून घेण्याची असताना तेथे १३०० हून अधिक बंदीवान आहेत, असा दावा जेठमलानी यांनी न्यायालयात केला. इतर सर्व मुद्दे बाजूला ठेवा, पण केवळ स्थितीकडे पाहता माझ्या अशिलाला तुरुंगात ठेवणे योग्य आहे का, याचा न्यायालयाने विचार करावा, असेही वकिलांनी सुचविले. ‘आम्ही हे जर मान्य केले तर संपूर्ण प्रकरण मिटेल’ या शेऱ्यासह न्यायालयाने पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी निश्चित केली.