कोकण विभागातील अग्रगण्य स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २०१५-१६ आर्थिक वर्षांत ३.३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून या वर्षांतील संस्थेची कर्जवसुलीही शंभर टक्के राहिली आहे.

आर्थिक वर्षांच्या अखेरच्या दिवशी ताळेबंद जाहीर करण्याची परंपरा कायम राखताना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षांत संस्थेच्या ठेवी ११२ कोटी रुपयांवर तर सोनेतारण व नियमित कर्ज मिळून एकूण कर्ज वितरण ७६.४२ कोटी रुपयांचे झाले आहे. संस्थेची आर्थिक ताकद मानल्या जाणाऱ्या स्वनिधीमध्ये २.८४ कोटींची वाढ होऊन तो १०.७२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रतिवर्षी स्वनिधीमध्ये ७.५ टक्के वाढ आवश्यक असताना प्रत्यक्षात झालेली ३६.१८ टक्के वाढ हा नवा विक्रम असल्याचेही पटवर्धन यांनी नमूद केले.

आधीच्या वर्षांपेक्षा या वर्षांत खेळत्या भांडवलामध्ये ९ कोटी १९ लाख रुपयांची वाढ होऊन एकूण भांडवल १२८ कोटी ८९ लाख रुपये झाले आहे. खेळत्या भांडवलाशी असलेले २.५९ टक्के हे निव्वळ नफ्याचे प्रमाण आर्थिकदृष्टय़ा आदर्श असल्याचेही पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी शहर व जिल्ह्य़ात मिळून पतसंस्थेच्या असलेल्या आठही शाखा नफ्यात असून एकूण ग्राहकसंख्या २६ हजारांवर गेली आहे. तसेच या वर्षांत आणखी तीन नवीन शाखा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी शहरातील मारुती मंदिर शाखा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून शिरगांव आणि मिरकरवाडा या अन्य दोन ठिकाणीही या वर्षांत शाखा सुरू केल्या जाणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

राज्यातील पतसंस्थांची संख्या काही हजार असली तरी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या संस्था अवघ्या २७ आहेत. त्यामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा समावेश आहे.