मागील आठवड्यामध्ये एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीसाठी १८ हजार कोटींची किंमत मोजण्याची तयारी दाखवत बोली जिंकणाऱ्या टाटा समुहाने आता आणखीन एका खरेदीची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र ही खरेदी एका परदेशी कंपनीकडून असणार असून संपूर्ण कंपनी नाही तर केवळ कारखाना खरेदी करण्याचा टाटांचा विचार असल्याचं समजतं. तामिळनाडू सरकार सध्या टाटा समुहाशी चर्चा करत आहे. राज्यामधील फोर्ड कंपनीचा कारखाना टाटा विकत घेतील का याबद्दल चर्चा सुरु आहे. चेन्नईमधील मराइमलाई नगरमध्ये असणारा हा फोर्डचा कारखाना पुढील वर्षी फोर्ड कंपनीकडून बंद करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरु असल्याचं वृत्त इकनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

नक्की पाहा >> कपडे, खेळणी, टॅक्सी, फर्निचर, गाड्या, इंधन अन्… रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Startups मध्ये मराठमोळ्या मुलीच्या कंपनीचाही समावेश

टाटा मोटर्स हा कारखाना विकत घेण्याची चर्चा सुरु होण्यामागील मुख्य कारण म्हणजे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांना काही दिवसांपूर्वीच भेटले. हा राज्य आणि टाटा समुहामधील चर्चेचा दुसरा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. मागील दोन आठवड्यांपासून सरकार आणि टाटा ग्रुप यासंदर्भात चर्चा करत आहे. २७ सप्टेंबर रोजी टाटा मोटर्सचे मुख्य निर्देशक गिरिश वाघ यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती.

या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नसली तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामुळेच याबद्दल काही घोषणा असेल तर ती अधिकृतपणे मुख्यमंत्री कार्यालयाकडून केली जाईल. ईटीने टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखरन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सहज भेट घेतली होती. तसेच या संदर्भातील चर्चा हा तर्क असल्याचंही कंपनी प्रवक्त्यांनी म्हटलंय.

फोर्डच्या या कारखान्यामध्ये वर्षाला दोन लाख गाड्या तयार करण्याची क्षमता आहे. तर तीन लाख ४० हजार इंजिन्स इथे तयार केले जातात. ३० वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात करण्यात येणाऱ्या इकोस्पोर्ट्स आणि एण्डीव्हर या गाड्यांची निर्मिती येथे केली जाते. अमेरिकन कार निर्मिती कंपनीने एक बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करत हा कारखाना सुरु केला होता. कंपनीचा दुसरा एक कारखाना गुजरातमधील सानंद येथेही आहे.

नक्की वाचा >> “हा तर टाटा इफेक्ट”: २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना…

फोर्डने भारतामध्ये निर्मिती बंद करण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देशभरामध्ये कंपनीचे १७० डिलर्स आहेत तर ४०० शोरुममध्ये कंपनीचा थेट संबंध असून हजारो लोक यासाठी काम करतात. यामध्ये सेल्स, आफ्टर सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. फोर्ड कंपनी ओला आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रासोबत कारखान्यासंदर्भात काही व्यवहार होतो का याची चाचपणी करत होती मात्र ती त्यामध्ये पुढे काहीही झालं नाही.

फोर्ड ही जगातील सर्वात जुन्या वाहननिर्माता कंपन्यांपैकी एक आहे. जगातील प्रमुख पाच कारनिर्मात्यांत या कंपनीचा समावेश आहे. ९० च्या दशकात कंपनीने भारतात आपला व्यवसाय सुरू केला. पहिला प्रकल्प चेन्नई आणि दुसरा प्रकल्प गुजरात सानंद येथे उभारला. हे दोन्ही प्रकल्प कंपनी बंद करीत आहे. डिसेंबपर्यंत सानंद प्रकल्प तर जूनपर्यंत चेन्नई प्रकल्प बंद केला जाईल. हे दोन्ही प्रकल्प बंद होणार म्हणजे कंपनी भारतातून आपला व्यवसाय पूर्ण बंद करणार आहे असे नाही. तेथील कारची निर्मिती बंद करणार असून सेवा मात्र सुरूच ठेवणार आहे. कार आयात करून त्या भारतात विक्री करणार आहे. सानंद प्रकल्पात ५०० कर्मचारी इंजिन बनविण्याचे काम सुरू ठेवतील असे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे फोर्डच्या भारतात निर्मिती होत असलेल्या फिगो, अ‍ॅस्पायर, फ्री स्टाईल, इको स्पोर्ट या कारचे उत्पादन बंद होणार आहे. म्हणजे फोर्ड आता यापुढे परवडणाऱ्या कार ग्राहकांना देणार नाही, हे स्पष्ट होते. फोर्ड भारतात यापुढे फक्त महागडय़ा कार विकणार आहे.