वैयक्तिक गुंतवणुकीद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये रस दाखविणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहातील खासगी समभाग निधी गटाने उबर या टॅक्सी सेवा कंपनीत हिस्सा खरेदी केली आहे. समूहातील टाटा कॅपिटलने मार्गदर्शन केल्यानंतर टाटा अपॉच्र्युनिटी फंडाने याद्वारे भारताबाहेरील पहिली गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे उबर ही काही दिवसांपूर्वी टाटा यांनी वैयक्तिक गुंतवणूक केलेल्या ओलाची स्पर्धक कंपनी आहे.
उबर ही मूळची अमेरिकेतील टॅक्सी सेवा कंपनी असून गेल्या काही महिन्यांपासून ती मोबाइल व्यासपीठावर व्यवसाय विस्तार करत आहे. उबरमध्ये यापूर्वी एका आघाडीच्या प्रसारमाध्यम समूहानेही गुंतवणूक केली आहे.
टाटा सन्स समूहाच्या वित्त क्षेत्रातील टाटा कॅपिटलने केलेल्या मार्गदर्शनानुसार टाटा अपॉच्र्युनिटी फंडाने उबरमधील काही हिस्सा खरेदी केला आहे. मात्र तो नेमका किती व काय मूल्याने खरेदी केला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
उबरच्या भारत तसेच चीनमधील यशस्वी व्यवसायाने प्रेरित होऊनच आम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, असे फंडाच्या भारतातील सल्लागार चमूचे व्यवस्थापकीय भागीदार पद्मनाभ सिन्हा यांनी म्हटले आहे. उबरचे तंत्रज्ञान लाखो व्यक्तींकरिता आर्थिक व्यवसाय संधी उपलब्ध करून देत असून हजारो पहिल्या पिढीचे उद्यमी नेतृत्व घडवत आहे, असेही सिन्हा म्हणाले. तर भारतातील उद्यमशीलतेला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या टाटा फंडाबरोबरच्या भागीदारीबाबत आम्ही खूपच उत्सुक आहोत, असे उबरच्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख अमित जैन यांनी म्हटले आहे.
रतन टाटा वैयक्तिक स्वरूपात यांची अल्टाएरोज एनर्जीज, स्नॅपडील, ब्ल्यूस्टोन, स्वास्थ्य इंडिया, अर्बनलॅडर, कारदेखो.कॉम, ग्रामीण कॅपिटल, पेटीएम, शिओमी व कार्या या १० कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.
भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रात उबरने दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. कंपनीच्या १८ शहरांमध्ये टॅक्सी धावत असून तिच्याबरोबर १.५० लाख चालक जोडले गेले आहेत. कंपनीच्या ग्राहकसंख्येत महिन्याला ४० टक्के वाढ नोंदली जात आहे. कंपनीकडे सध्या ३५ टक्के बाजारहिस्सा आहे.
येत्या सहा महिन्यांत दिवसाला १० लाख फेऱ्यांचे लक्ष्य राखणाऱ्या उबरने गेल्याच महिन्यात १ अब्ज डॉलरच्या अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली होती. टाटांमार्फत झालेली गुंतवणूक कंपनी तिच्या विस्तार कार्यक्रमासाठी उपयोगात आणणार आहे.

संधींचे सोने..
टाटा अपॉच्र्युनिटी फंडाने उबरमध्ये केलेल्या ताज्या गुंतवणुकीआधी जिंजर हॉटेल्स, टाटा स्काय, व्हेरॉक इंजिनीअरिंग, श्रीराम प्रॉपर्टीज, टाटा प्रोजेक्ट्स तसेच टीव्हीएस लॉजिस्टिक्स आदी कंपन्यांमध्ये अजवर ४० कोटी डॉलरची दीघरेद्देशी गुंतवणूक केली आहे.