नवी दिल्ली : टाटा समूहातील कंपनी असलेली टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील आपले स्थान भक्कम करण्यासाठी इतर कंपन्या आणि नाममुद्रांच्या संपादनाची योजना आखत आहे. ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील पाच आघाडीच्या नाममुद्रा ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.

मुबंईत मुख्यालय असलेल्या टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि स्पर्धात्मक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत स्थान बळकट करण्यासाठी टेटली टी आणि एट ओ क्लॉक कॉफी यांच्याप्रमाणेच काही नावाजलेल्या नाममुद्रा ताब्यात घेण्यासाठी संबंधित कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. मात्र टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसूझा यांनी नेमक्या नाममुद्रांचा उलगडा केला नाही. ग्राहकोपयोगी क्षेत्रातील इतर कंपन्या संपादित करण्याचा कंपनीत गंभीरतेने विचार सुरू असल्याचे मात्र त्यांनी स्पष्ट संकेत दिले. कात टाकून २०२० मध्ये नवीन रूप धारण केलेल्या टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने बाटलीबंद पाणी आणि सोलफुलसारख्या नाममुद्रांच्या अधिग्रहणाने तयार न्याहरीच्या व्यवसायात विस्तार केला.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सला युनिलिव्हर आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, रिलायन्सही येत्या सहा महिन्यांत साठहून अधिक किराणा आणि वैयक्तिक निगा आणि ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रांच्या खरेदीची योजना आखत आहे.

करोनाचा संसर्ग देशात कमी झाल्यामुळे आता देशभरातील टाटा-स्टारबक्स दालनांच्या विस्ताराला गती देण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ५० नवीन कॅफे यात जोडली गेली आहेत. सध्या देशातील २६ शहरांमध्ये त्याची २६८ कॅफे कार्यरत आहेत. कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकी नामांकित नाममुद्रेसह या संयुक्त उपक्रमातून भारतात एक हजाराहून अधिक स्टारबक्स कॅफे सुरू करण्याचा मानस असल्याचे डिसूझा यांनी स्पष्ट केले.