टाटा समूह आणि एअरबसने भारताच्या हवाई दलासाठी ‘सी २९५’ या लष्करी मालवाहतूक विमानांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार शुक्रवारी येथे केला. लष्करी सामग्री उत्पादनातील हा खासगी क्षेत्राकडून पूर्तता केला जाणारा आजवरचा सर्वात मोठा करार असून, त्याचे मूल्य २२ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे अंदाजण्यात येत आहे.

टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्यामधील या भागीदारी कराराला वाट मोकळी करून दिल्याबद्दल टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी संरक्षण मंत्रालयाचे अभिनंदन केले आहे. भारतातील हवाई क्षेत्र खुले करण्याच्या दिशेने पडलेले हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे.

एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीकडून एकूण ५६ ‘सी २९५’ या लष्करी मालवाहतूक विमाने देशाच्या हवाई दलात येणार आहेत. मात्र ५६ पैकी ४० विमानांची निर्मिती भारतात होणार आहे. करारानुसार ‘एअरबस डिफेन्स’कडून पहिली १६ विमाने स्पेनमधून जुळणी करून पुरविली जाणार आहेत. उरलेली ४० विमाने टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लि. या कंपनीकडून भारतात तयार केली जाणार आहेत. उभयतांनी या संबंधाने औद्योगिक भागीदारी केली आहे.

नव्याने दाखल होत असलेली विमाने सध्या हवाई दलाकडे असलेल्या अ‍ॅव्हरो ७४८ विमानांची जागा घेतील. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ समितीने या करारास मान्यता दिल्यानंतर दोन आठवडय़ांनी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी सुकरण सिंग यांनी, हा करार म्हणजे टाटा समूहासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद करीत, भारतीय लष्करी उत्पादन क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

तब्बल २५ हजार रोजगारनिर्मिती

प्रथमच भारतात उत्पादन होत असलेली ‘सी २९५’ विमाने ही बहुउद्देशी असून, त्यांची रचना व इतर वैशिष्टय़े भारतीय हवाई दलाच्या अनेकांगी गरजा पूर्ण करणारी आहेत. विमानांच्या घडणीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दर्जाची पुरवठा साखळी भारतात तयार केली जाईल, जी या आधी अस्तित्वात येऊ शकली नसती, असे प्रतिपादन रतन टाटा यांनी केले. तर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीचे मुख्याधिकारी मायकेल शोलहोर्न यांच्या मते, दहा वर्षांत प्रकल्पामुळे कौशल्याधारीत १५ हजार थेट व अप्रत्यक्ष १० हजार रोजगार तयार होतील.

‘एअरबस’शी २२,००० कोटींचा सामंजस्य करार देशात सक्षम पुरवठा साखळी तयार होईल – रतन टाटा