मुंबई : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी असलेली टाटा समूहातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) आखलेल्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वात मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला होणार आहे. या बायबॅक योजनेत टाटा सन्स सहभागी होणार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

टीसीएसच्या संचालक मंडळाने सरलेल्या बुधवारी १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेवरही मोहोर उमटवली. विद्यमान भागधारकांच्या हाती असलेल्या समभागांची प्रत्येकी ४,५०० रुपये किमतीला खरेदी केली जाणार आहे. टाटा सन्सकडे टीसीएसचे २६६.९१ कोटी समभाग असून, टाटा समूहातील सर्व कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या या कंपनीचा समभाग पुनर्खरेदी योजनेअंतर्गत २.८८ कोटी समभाग विक्री करण्याचा मानस आहे. तर टाटा समूहातील दुसरी कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे १०,२३,६८५ समभाग आहेत, त्यापैकी ११,०५५ समभागांची विक्री ती करू इच्छित आहे. परिणामी टाटा समूहातील दोन्ही कंपन्यांना टीसीएसच्या १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून १२,९९३.२ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी १८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान टीसीएसने जाहीर केलेल्या १६,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतदेखील सहभागी होऊन टाटा सन्सने ९,९९७.५ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले होते. तर त्याआधी टीसीएसने १८ मे ते ३१ मे २०१७ दरम्यान केलेल्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून टाटा सन्सने १०,२७८ कोटी रुपयांचा धनलाभ मिळविला होता. शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२२ रोजी प्रवर्तक कंपन्यांची टीसीएसमध्ये ७२.१९ टक्के भागभांडवली हिस्सेदारी आहे.

लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला आहे. टीसीएसकडे सप्टेंबर २०२१ तिमाहीअखेर ५१,९५० कोटी रुपयांची रोकड गंगाजळी आहे.