ब्रिटनमधील कोरस कंपनी ताब्यात घेत पोलाद उत्पादकांमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या दहामध्ये स्थान मिळविणाऱ्या टाटा समूहाने तिचा युरोपमधील एक व्यवसाय स्वित्झर्लँडच्या क्लेच समूहाला विकला आहे.
याबाबत घोषणा करताना टाटा स्टीलने हा व्यवहार किती रकमेत झाला, हे स्पष्ट केलेले नाही. कंपनीने कोरस ताब्यात घेतल्यापासून आतापर्यंत युरोपमध्ये १.२ अब्ज युरोची गुंतवणूक केल्याचे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.
जिन्हेव्हा येथे मुख्यालय असलेल्या लाँग प्रॉडक्ट्स हा विभाग रूळ, रॉड तसेच पत्रे आदी उत्पादने घेतो. या व्यवहाराबाबत कर्मचारी संघटनेने मात्र आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप व्यवस्थापनावर केला आहे.
लाँग प्रॉडक्ट्सचे युरोपातील स्कॉटलँड, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीमध्ये अस्तित्व आहे. या विभागात तूर्त ६,५०० हून अधिक कर्मचारी आहेत. तर टाटा स्टीलचे ब्रिटनच्या १७,५०० सह एकूण युरोपमध्ये ३०,५०० कर्मचारी आहेत.
टाटा स्टीलने ब्रिटनमधील कोरस कंपनी २००७ मध्ये १३ अब्ज डॉलरना खरेदी केली होती.