हायब्रिड विद्युत बस पुरविण्याचे  ‘मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण’(एमएमआरडीए)चे कंत्राट टाटा मोटर्सने मिळविले आहे. डिझेल तसेच विजेवर धावू शकणाऱ्या २५ बसेस कंपनी पुरवेल. या वाहन गटातील कंपनीकरिता हे सर्वात मोठे कंत्राट आहे. या कंत्राटाची रक्कम मात्र स्पष्ट करण्यात आलेली नाही. एमएमआरडीए मार्फत या बस उपनगरातील शीव, कुर्ला तसेच वांद्रे या परिसरात चालविल्या जाणार आहेत. वांद्रे – कुर्ला संकुलातून या बस सुटतील.

नव्या कंत्राटाबाबत टाटा मोटर्सच्या व्यापारी वाहन विभागाचे कार्यकारी संचालक रवि पिशारोदी म्हणाले की, ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून मुंबई शहरासाठी शाश्वत वाहतूक पर्याय त कंपनीला देता आला. विजेवरील वाहने ही भविष्यातील काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. या वाहनांद्वारे अन्य वाहनांच्या तुलनेत २५ ते ३० टक्के इंधन बचत तर ३० ते ३५ टक्के प्रदूषण कमी केले जाते, असे त्यांनी सांगितले.