scorecardresearch

टाटा न्यू अ‍ॅपच्या व्याप्तीचा समूहाबाहेरील कंपन्यांपर्यंत विस्तार शक्य – चंद्रशेखरन

टाटा न्यू हे टाटा उद्योगसमूहातील सर्व डिजिटल सेवा एकाच मंचावर उपलब्ध करून देणारे मोबाइल उपयोजन आहे.

मुंबई : टाटा समूहातील विविध नाममुद्रांमध्ये व्यवहार-विनिमयासाठी सादर करण्यात आलेल्या टाटा न्यू अ‍ॅपची कवाडे ही टाटा समूहाबाहेरील इतर कंपन्यांच्या नाममुद्रांसाठीही खुली असतील, असे टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अ‍ॅप सादरीकरणाच्या मुंबईत गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमात स्पष्ट केले.

टाटा न्यू हे टाटा उद्योगसमूहातील सर्व डिजिटल सेवा एकाच मंचावर उपलब्ध करून देणारे मोबाइल उपयोजन आहे. या कार्यक्रमात टाटा डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक पाल आणि अध्यक्ष  मुकेश बन्सल (कल्टफिट आणि मिंत्राचे संस्थापक) तसेच टाटा समूहातील विविध नाममुद्रांचे प्रमुख उपस्थित होते.

टाटा न्यू अ‍ॅपला ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी डिजिटल मंचावर उत्पादन, सेवा आणि आर्थिक गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारे सुपर अ‍ॅप बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून ग्राहकांना टाटा समूहाबरोबरच इतर कंपन्यांच्या उत्पादन, सेवा खरेदीचा लाभ घेता येणार आहे, असे चंद्रशेखरन या वेळी बोलताना म्हणाले.

टाटा न्यू अ‍ॅपमध्ये विस्तारा, एअर इंडिया, टायटन, तनिष्क, टाटा मोटर्स वगळता टाटा समूहातील बहुतेक नाममुद्रांची सेवा उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र थोडय़ाच कालावधीत टाटा समूहातील सर्व नाममुद्रा या अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल मंचावर उपलब्ध होतील.

अ‍ॅपवरील इतर नाममुद्रांच्या उपस्थितीसाठी अधिग्रहणाचा मार्गदेखील खुला ठेवण्यात आला आहे. सध्या बिगबास्केट आणि १एमजी हे अधिग्रहणाच्या माध्यमातून टाटा न्यू या डिजिटल मंचाचा भाग बनले आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata neu will go beyond tata group at some point n chandrasekaran zws

ताज्या बातम्या