तोटय़ापायी विकावे लागणाऱ्या टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील प्रकल्पासाठी अनिवासी भारतीय खरेदीदार पुढे येऊ पाहत आहे. लिबर्टी हाऊस या वायदा वस्तू व्यवहारातील कंपनीचे संजीव गुप्ता यांच्या हातात हा प्रकल्प देण्याची पूर्ण तयारी झाली असून त्याबाबतची अधिकृत घोषणा येत्या दोन ते तीन दिवसात केली जाण्याची शक्यता आहे.

टाटा स्टीलचा ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट येथील प्रकल्प विकण्याचा निर्णय टाटा समूहाने घेतला आहे. त्यासाठीच्या खरेदीदाराच्या शोध सध्या सुरू आहे. याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून समूहाच्या मुंबईतील मुख्यालयात बैठका सुरू आहेत. त्यांनी बुधवारी वेग घेतला. ब्रिटनचे व्यापार सचिव साजिद जावेद यांनी दक्षिण मुंबईतील समूहाच्या ‘बॉम्बे हाऊस’मध्ये बुधवारी बैठकीत भाग घेतला. यावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री हेही उपस्थित होते.

पोर्ट टॅलबोट प्रकल्पासाठी लिबर्टी हाऊसचे मुख्य कार्यकारी संजीव गुप्ता यांनी रस दाखविला आहे. त्याशिवाय जर्मनीच्या थायसीनक्रुप व ग्रेबुल हेही टाटांचा प्रकल्प खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र गुप्ता यांच्या प्रस्तावाला कंपनी प्रतिसाद देण्याची शक्यता असून खरेदी – विक्रीतील आर्थिक व्यवहाराच्या अंतिम सहमतीनंतर नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

टाटा स्टीलचे ब्रिटनमध्ये रॉथरहॅम, कॉर्बी, शोटॉन येथेही प्रकल्प आहेत. १५,००० हून अधिक कामगार तेथे कार्यरत आहेत.

आयात होणाऱ्या स्वस्त चिनी उत्पादनामुळे फटका बसत असलेल्या तोटय़ातील पोलाद उत्पादन प्रकल्प विकण्याच्या तयारी टाटा स्टीलने सुरू केली आहे. टाटा स्टीलने हे प्रकल्प सरकारकडे हस्तांतरित करून त्यांचे राष्ट्रीयीकरण करावे, असा ब्रिटनमधील कामगार संघटनांचा आग्रह आहे. कंपनीने ३ अब्ज डॉलरचे नुकसान सोसले आहे. कोरसच्या माध्यमातून टाटा समूहाने दशकापूर्वी युरोपात शिरकाव केला होता.

दरम्यान, टाटा स्टीलला ओडिशातील १९९ हेक्टरवर प्रकल्प विस्ताराकरिता केंद्रीय पर्यावरण खात्यांतर्गत येणाऱ्या वन सल्लागार समितीने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे समभाग मूल्यही व्यवहारअखेर ५.२४ टक्क्यांनी झेपावत ३२८.४५ रुपयांवर स्थिरावले.