scorecardresearch

तिमाही महसुलात ‘टीसीएस’कडून ५० हजार कोटींचा टप्पा ; निकाल हंगामाची दमदार सुरुवात

कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाही महसुलात पहिल्यांदाच ५०,००० कोटींपुढील टप्पा ओलांडणारी कामगिरी केली

मुंबई : देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) सोमवारी चौथ्या तिमाहीच्या मिळकतीच्या हंगामाची दमदार सुरुवात करून दिली. कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाही महसुलात पहिल्यांदाच ५०,००० कोटींपुढील टप्पा ओलांडणारी कामगिरी केली आणि वार्षिक तुलनेत ७.४ टक्क्यांची वाढ नोंदवून ९,९२६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली.

विविध ४६ देशांमध्ये व्यवसाय फैलावलेल्या या मुंबई मुख्यालय असलेल्या टीसीएसने सरलेल्या मार्च तिमाहीत महसुलात वार्षिक आधारावर १५.८ टक्क्यांच्या वाढीसह तो ५०,५९१ कोटी रुपयांवर नेला आहे. परिणामी कंपनीचा वार्षिक महसूलही प्रथम २५ अब्ज अमेरिकी डॉलरपुढे (२५.७ अब्ज डॉलर) गेला आहे, रुपयांमध्ये त्याचे मूल्य १,९१,७५४ कोटी रुपये असे आहे. वार्षिक तुलनेत ते १४.८ टक्क्यांनी वाढले आहे.

मध्यमकालीन सशक्त वाढीच्या दृष्टिकोनासह आणि आतापर्यंतची जास्तीत जास्त महसुली वाढ नोंदवून आर्थिक २०२१-२२ ची मजबूत कामगिरीसह आपण सांगता केली आहे, असे भाष्य टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी येथे सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केले. कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये एकूण ११.३ अब्ज डॉलरच्या करार मूल्यासह, पूर्ण वर्षांसाठी आजवरच्या सर्वाधिक ३४.६ अब्ज डॉलरच्या कार्यादेशांची (ऑर्डर बुक) नोंद केली आहे.

चौथ्या तिमाहीत टीसीएसने ३५,२०९ कर्मचारी नक्त रूपात जोडले, जे एका तिमाहीतील मनुष्यबळात झालेली सर्वाधिक वाढ आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरीस कंपनीतील पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या ५,९२,१९५ इतकी होती, ज्यामध्ये वर्षभरात १,०३,५४६ अशी सार्वकालिक उच्च वाढ झाली आहे. विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षांत ४०,००० नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियोजन असल्याचे कंपनीने जाहीर केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tcs q4 results revenue soars to rs 50591 cr zws