भारतातील वस्त्रोद्योग निर्यातीला नजीकचे भविष्य आशावादी असल्याचा विश्वास करीत, २०१५-१६ आर्थिक वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले १८ अब्ज अमेरिकी डॉलर (साधारण १.१० लाख कोटी रुपये) निर्यात लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास या उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय)’ने अलीकडेच व्यक्त केला.
सरलेल्या २०१४-१५ सालात देशातील कापड उद्योगाची निर्यात १२.२ टक्क्य़ांनी वाढून ९०,७९० कोटींवरून, १.०३ लाख कोटी रुपयांवर (१६.८ अब्ज डॉलर) गेली आहे.
भारतीय उद्योगांसाठी सर्वात मोठे आयातदार असलेल्या अमेरिकेतील सुधारत असलेली अर्थस्थिती, शिवाय आपल्या उद्योगांचे मोठे स्पर्धक असलेल्या बांगलदेश आणि चीन या देशांमधील कामगारांचा वाढत्या मोबदला व पायाभूत सुविधांविषयक समस्या पाहता, भारतातून निर्यातीला चांगले भवितव्य असल्याचे सीएमआयएचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले.
देशांतर्गत मागणीतही बहरत चाललेला मान्सूनमुळे येत्या काळात वाढ दिसून येईल. विशेषत: एप्रिलमधील नरमाई वगळता मेपासून एकूण उद्योगक्षेत्राने वेग पकडल्याचे दिसून येत आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले. येत्या पाच वर्षांत देशातील वस्त्रप्रावरण निर्मिती उद्योगाचे आकारमान आजच्या तुलनेत पाच पटीने वाढण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकूण आशादायी चित्राच्या पाश्र्वभूमीवर ‘सीएमआयए’ने येत्या २९ जून ते १ जुलै २०१५ या दरम्यान देशातील सर्वात मोठय़ा वस्त्र-प्रदर्शनाचे आयोजन गोरेगाव येथील एनएसई संकुलात केले आहे. या व्यापार ते व्यापार धाटणीच्या ६१ व्या राष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार करणार आहेत. विविध ७८० फॅशन ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व करणारी ७०० दालने प्रदर्शनात थाटण्यात येणार आहेत.