मुंबई : ऊर्जा क्षेत्र विचारसरणीवर नाही, तर तंत्रज्ञानावर चालते. पुढील पंचवीस वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे भाकीत माजी केंद्रीय ऊर्जामंत्री सुरेश प्रभू यांनी वर्तवले आहे. वीज वितरणातील तांत्रिक व महसुली हानीवर केवळ खासगीकरण हा पर्याय नाही, तर तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या तोट्यात असलेले भाग नफ्यातही आणता येतात, असेही त्यांनी नमूद केले.

ऊर्जा क्षेत्रावर २५ वर्षांहून अधिक काळ ठसा उमटवणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून देशातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सुरेश प्रभू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानिमित्ताने सुरेश प्रभू यांनी ऊर्जा क्षेत्रातील गेल्या २५ वर्षांचा आढावा घेत भविष्याचा वेध घेतला आहे.

ऊर्जा क्षेत्रात पुढील २५ वर्षांत तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होतील. अपारंपरिक स्रोतांद्वारे वीजनिर्मितीतील वाढ ही त्यात प्रमुख असेल. त्यानंतर वीज पारेषण आणि विजेच्या वितरणातही तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होतील. बिनतारी विद्युतप्रवाह म्हणजेच वायरलेस इलेक्ट्रिसिटी या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्याचे काही परिणाम आपल्याला दिसतील. तिसरा महत्त्वाचा बदल हा वीजनिर्मिती क्षेत्रात अपेक्षित असून आतापर्यंत अज्ञात असलेले वीजनिर्मितीचे स्रोत विकसित होतील, असे सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले.

एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करण्याच्या सध्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊन विकेंद्रित पद्धतीने छोट्या छोट्या प्रमाणात वीजनिर्मिती होईल असे तंत्रज्ञान पुढे येण्याची अपेक्षा आहे अशी पुस्तीही प्रभू यांनी जोडली.

केंद्रीय वीज कायदा २००३ मुळे देशात ऊर्जा क्षेत्रात सुधारणांचे वारे वाहू लागले. वीजनिर्मिती आणि नियामक क्षेत्रात मोठे बदल झाले अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना मिळाली या जमेच्या बाजू आहेत. मात्र वीज वितरण क्षेत्रात आपल्याला आवश्यक यश मिळाले नाही हे वास्तव आहे, असे सुरेश प्रभू यांनी नमूद केले. वीजहानी आणि महसूलहानी या वीज वितरण कंपन्यांसमोरील मोठ्या समस्या आहेत. केवळ खासगीकरण हा त्यावरील एकमेव उपाय नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वीज आणि महसूल आणि जास्त असलेल्या भागात त्या समस्येवर मात करता येईल आणि तो भाग नफ्यात आणता येईल. फ्रँचाईजी पद्धती किंवा अन्य मार्गांचाही वापर शक्य आहे.

वीजहानी आणि महसूलहानी या वीज वितरण कंपन्यांसमोरील मोठ्या समस्या आहेत. केवळ खासगीकरण हा त्यावरील एकमेव उपाय नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर मात करता येईल.