भारतीय हवाई प्रवासी सेवा क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या मूळच्या मलेशियातील एअर एशियाच्या व्यवसायप्रमुखपदाची धुरा चेन्नईच्या मिट्टू शांडिल्य या अवघ्या ३३ वर्षीय व्यवस्थापन सल्लागाराकडे आली आहे.
मिट्टू यांची निवड केल्यानंतर त्यांचे नाव जाहीर करण्यापूर्वीच कोडकौतुक करणाऱ्या एअर एशिया समूहाचे टोनी फर्नाडिस यांनी यंदाही ट्विटरवरूनही ही नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे हवाई, वाहतूक तसेच आदरातिथ्य क्षेत्रातील सल्लागाराची आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका पार पाडणाऱ्या मिट्टू यांचा यानिमित्ताने थेट विशिष्ट क्षेत्रात प्रवेश झाला आहे.
एअर आशियाचे मुख्यालय चेन्नई येथे निश्चित केल्यानंतर याच भागातून एखादा उमेदवार असावा, असा टोनी यांचा आग्रह होता. कंपनीच्या प्रमुखपदावरील व्यक्तीचा उमेदवारी अर्ज पाहून आपण भारावून गेलो असून तो चेन्नईचाच एक तरुण मुलगा असल्याचे टोनी यांनी त्या वेळी म्हटले होते; मात्र त्यांचे नाव जाहीर केले गेले नव्हते. तर आताही ‘मिट्टू हे विमान सेवा सुरू होणाऱ्या भागातीलच असल्याने भारतीय हवाई सेवेची परिमाणे बदलतील; सर्व भारतीयांना माफक दरात हवाई उड्डाणाचा आनंद देतील,’ असा विश्वास टोनी यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. मिट्टू यांनीही आपण खऱ्या अर्थाने हवाई प्रवास काय असतो याची प्रचीती देऊ, असे निवडीनंतरचे भाष्य केले आहे.
एअर एशियाच्या माध्यमातून हवाई क्षेत्रात पुनप्र्रवेश होणाऱ्या या नव्या कंपनीत टाटा सन्सचा ३० टक्के हिस्सा आहे. तर मुख्य प्रवर्तक मलेशियाच्या एअर एशियाचा सर्वाधिक ४९ टक्के हिस्सा आहे. उर्वरित २१ टक्के हिस्सा अरुण भाटिया यांच्या टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस कंपनीचा आहे. कंपनी माफक दरातील हवाई प्रवासी सेवा पहिल्या टप्प्यात निवडक शहरांमधून करणार आहे.
जेट-एतिहाद व्यवहारामार्फत भारतीय हवाई सेवा क्षेत्रातील पहिली थेट विदेशी गुंतवणूक समजली जात असली तरी एअर एशिया-टाटा सन्समुळे प्रत्यक्षात पहिला मान मिळाला आहे. एअर आशिया इंडियात ८०.९८ कोटी रुपये गुंतवणुकीला सरकारने गेल्याच महिन्यात परवानगी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
‘एअर एशिया इंडिया’चा पहिला सीईओ अवघ्या ३३ वर्षांचा!
भारतीय हवाई प्रवासी सेवा क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या मूळच्या मलेशियातील एअर एशियाच्या व्यवसायप्रमुखपदाची धुरा चेन्नईच्या मिट्टू शांडिल्य या अवघ्या ३३ वर्षीय व्यवस्थापन सल्लागाराकडे आली आहे.
First published on: 16-05-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first 33 year old ceo of air asia india