रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती
दीर्घकालीन भविष्याचा विचार करण्यापेक्षा अल्प कालावधीतील समस्या हेरून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा; फार पुढच्या गोष्टी कदाचित माझ्यासारखी गव्हर्नर पदावरील व्यक्तीदेखील पूर्ण करू शकणार नाही, असे वक्तव्य रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी गुरुवारी येथे केले.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि एशिया सोसायटी इंडिया सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरिंदर एस. कोहली यांनी संपादित केलेल्या ‘द वर्ल्ड इन २०५०’ पुस्तक प्रकाशनास गव्हर्नर मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया व जे. पी. मॉर्गनचे भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ व कार्यकारी संचालक साजिद चिनॉय यांनी भाग घेतला.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांना सप्टेंबर २०१६ नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यावरून सध्या राजकीय वादंग सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर राजन यांच्या गुरुवारच्या वक्तव्याने काहीशी माघारीची पावले पडत असल्याचे मानले जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेचा गेल्या काही वर्षांतील आढावा घेताना राजन यांनी जगाने फार पुढचा विचार करण्याची गरज नाही; मात्र येत्या पाच ते दहा वर्षांत अर्थव्यवस्थेच्या सर्वच स्तरांवर येणाऱ्या समस्या आणि त्यांचा निपटारा हे एक मोठे आव्हान असेल, असे नमूद केले.
अधिक प्रमाणातील कर, स्वस्त सौर ऊर्जा, पर्यावरणातील आमूलाग्र बदल, विकसनशील देशांमध्ये उद्भवणारी युद्धजनक अर्थस्थिती ही जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हाने पुढील काळात असतील, असे राजन म्हणाले. या साऱ्यांचा निपटारा करावयाचा असेल तर नेमक्या समस्या हेरून योग्य उपाययोजना करण्याचे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

राजन यांनी पेरलेल्या ‘बॉम्ब’चा डिसेंबरमध्ये स्फोट; स्वामींचा हल्ला
* रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी अर्थव्यवस्थेत २०१३ मध्ये पेरलेल्या ‘टाइम बॉम्ब’चा डिसेंबर २०१६ मध्ये स्फोट होईल, असे वक्तव्य करत भाजपचे खासदार सुब्रमण्यण स्वामी यांनी नव्याने हल्लाबोल केला. राजन यांच्या धोरणामुळे बँकांना विदेशी चलनात २.४ अब्ज डॉलर चुकते करावी लागतील, याकडे ‘टाइम बॉम्ब’ असा त्यांनी ट्वीटद्वारे निर्देश केला.