‘सीएआयटी’चा इशारा
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंद मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिणामकारक हस्तक्षेप करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची मध्यवर्ती संघटना ‘सीएआयटी’ने केली आहे. हा बंद चिघळल्यास त्याचे परिणाम देशव्यापी आंदोलनात होतील, असा इशाराही मध्यवर्ती संघटनेने दिला आहे. एलबीटी मागे घेण्याची मागणी जवळपास गेल्या एका महिन्यापासून करण्यात येत असूनही सरकार त्याला योग्य प्रतिसाद देत नाही. त्यामुळे देशभरातील व्यापारीवर्गात नाराजीचा सूर आहे. एलबीटी लागू करण्याच्या विरोधातील आंदोलनाचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे, असे विविध व्यापारी संघटनांनी एका निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार या प्रश्नावर अद्याप तोडगा काढू शकलेले नाही, त्यामुळे चव्हाण यांनी आता हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याची सूचनाही केली आहे.