तृतीय पक्ष वाहन विमा १ जूनपासून महागणार!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी विविध श्रेणीतील वाहनांसाठी तृतीय पक्ष दायित्व (थर्ड-पार्टी) वाहन विम्याच्या हप्ते दरात वाढ केली आहे.

पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी विविध श्रेणीतील वाहनांसाठी तृतीय पक्ष दायित्व (थर्ड-पार्टी) वाहन विम्याच्या हप्ते दरात वाढ केली आहे. येत्या १ जूनपासून ही दरवाढ लागू होत असून, त्यातून चारचाकी आणि दुचाकींच्या विमा खर्चात वाढ होणार आहे. मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित दरांनुसार, एक हजार सीसीपर्यंत इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी तृतीय पक्ष वाहन विमा हप्ता सध्याच्या २,०७२ रुपयांवरून वाढून २,०९४ रुपये निश्चित करण्यात आला आहे. तसेच १००० सीसी ते १५०० सीसी वाहनांसाठी विमा हप्ता ३,४१६ रुपये करण्यात आला आहे. तो याआधी ३,२२१ रुपये होता. १५०० सीसी क्षमतेपेक्षा अधिक वाहनांच्या विमा हप्तय़ात किरकोळ वाढ झाली आहे. तो आता ७,८९० रुपयांवरून वाढून ७,८९७ रुपये करण्यात आला आहे.

विमा नियामक ‘इर्डा’कडून तृतीय पक्ष दायित्व वाहन विम्याचे दर निश्चित केले जातात. यंदा मात्र प्रथमच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘इर्डा’शी चर्चा करून विम्याचे सुधारित दर जाहीर केले आहेत.

दुचाकींच्या विमा हप्तय़ात वाढ

येत्या १ जूनपासून १५० सीसीपेक्षा अधिक मात्र ३५० सीसीपर्यंतच्या दुचाकींचा विमा हप्ता १,३६६ रुपये असेल, तर ३५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींसाठी विमा हप्ता २,८०४ रुपये आकारण्यात येईल. केंद्र सरकारने हायब्रीड विद्युत वाहनांसाठी विमा हप्तय़ावर ७.५ टक्के सूट जाहीर केली आहे. खासगी वापराच्या ३० किलोवॅट क्षमतेच्या ई-वाहनासाठी १,७८० रुपये विमा हप्ता घेतला जाईल. तर ३० किलोवॅट ते ६५ किलोवॅट क्षमतेच्या विद्युत वाहनासाठी २,९०४ रुपये हप्ता आकारण्यात येईल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Third party auto insurance will go road transport highway ministry ysh

Next Story
अंबुजा, एसीसीच्या भागधारकांकडील समभाग खरेदी ६ जुलैपासून
फोटो गॅलरी