चालू आर्थिक वर्षांतील भांडवली बाजाराच्या व्यवहारातील गुरुवार (दि.२८) हा शेवटचा दिवस आहे. वायदेपूर्तीच्या सौद्यासह वर्षांतील व्यवहाराची अखेरही या दिवशी होत आहे. नव्या उच्चांकाला गवसणी घालण्याची आस असलेल्या शेअर निर्देशांकांनी गुंतवणूकदारांची पार निराशा केली.  त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांतही ‘सेन्सेक्स’ पुन्हा ऐतिहासिक टप्प्याला हुलकावणी देणार काय, यावर  गुंतवणूकदारांची नजर असेल.
सोमवार ते शुक्रवार असा प्रवास होणाऱ्या भांडवली बाजाराला ‘गुड फ्रायडे’ निमित्ताने २८ मार्च रोजी सुटी आहे. त्यामुळे यावेळी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसाचे व्यवहार होणार नाहीत. तर एकूण आर्थिक वर्षांसह महिन्याची अखेरही रविवारी ३१ मार्चला होत आहे. आदल्या दिवशी शनिवार (दि. ३०) असल्याने भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत. धुलिवंदननिमित्ताने बुधवारीही (दि.२७) बाजार बंद होता. चालू आठवडय़ात अवघे दोन दिवसच व्यवहार झाले असून पैकी पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराने सलग सातव्या सत्रातील घसरण नोंदविली. तर दुसऱ्या दिवशी झालेल्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’ने घसरणीतील ही ‘सप्तपदी’ मोडून काढत किरकोळ निर्देशांक वाढीसह भांडवली बाजाराला गेल्या चार महिन्यांच्या तळातूनही बाहेर काढले. गेल्या सलग सात सत्रात मुंबई निर्देशांक ८८९.०२ अंशांनी आपटला आहे.
एकूण २०१२ या कॅलेंडर आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षांतही भांडवली बाजाराच्या अनोख्या टप्प्याबाबत वेळोवेळी अंदाज वर्तविले गेले. डिसेंबर २०१२ अखेपर्यंत ‘सेन्सेक्स’ २५ हजार जाणार हे वर्तविले गेलेले भाकीत स्मरणातून जात नाही तोच डिसेंबर २०१३ पर्यंत मुंबई निर्देशांक २२,५०० (हा बार्कलेजचा अंदाज) गाठणार, असे गाजर दाखवू लागले.
मुंबई शेअर बाजार १० जानेवारी २००८ मध्ये इतिहासात पहिल्यांदा २१,२०६.७७ या उच्चांकी कळसाला पोहचला होता. तर दोन वर्षांनंतर (५ नोव्हेंबर २०१० रोजी) व्यवहार बंद होताना ‘सेन्सेक्स’ २१,००४.९६ या सर्वाधिक उंचीवर विराजमान झाला होता. त्यानंतर वेळोवेळी मुंबई निर्देशांक त्याचा ऐतिहासिक उच्चांक मागे टाकेल, असे भाकित केले गेले.
प्रत्यक्षात गेल्या तीन महिन्यात उलटेच घडत आले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांना फारशी झळ बसलेली दिसत नसली, तरी २०१२-१३ मध्ये सामान्य गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मिड-कॅप (-१४.८०%) आणि स्मॉल-कॅप निर्देशांकाची (-२२.३९%) वाताहत गुंतवणूकदारांना अस्वस्थ करून सोडणारी आहे. एकूणच गेल्या काही महिन्यांच्या अस्थिर वातावरणाने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २०१३ मध्ये आतापर्यंत ५३,३७७.६० कोटी रुपये काढून घेतले इतकेच नाही तर मुंबई शेअर बाजाराच्या दफ्तरी असलेले नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवलही घसरून ५.९६ लाख कोटी रुपयांवर आले. गेले अनेक महिने १९ हजारांभोवती घुटमळणारा संवेदनशील ‘सेन्सेक्स’ही वर्षांच्या तुलनेत ३.८३% टक्क्यांनी खालीच आहे.
सुरुवात सप्ताहारंभापासून..
नव्या आर्थिक वर्षांची सुरुवात १ एप्रिलपासून होत असते. एरवी गंमतीत हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा होत असला तरी अर्थव्यवस्थेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. असे असताना यंदा नव्या वर्षांचा पहिला दिवस हा साप्ताहिक कामकाजाचाही शुभारंभाचा म्हणजे सोमवारचा दिवस ठरणार आहे. सोमवार आल्याने खऱ्या अर्थाने एकूणच व्यवहारांची सुरूवात ताजीतवानी ठरणार आहे.
तत्पूर्वी बँक क्षेत्र चालू आठवडा अनोख्या पद्धतीने व्यतीत करत आहे. अनेक बँक कर्मचाऱ्यांनी ‘इयर एन्ड’ आणि सततचे ‘बँक होलिडे’ यामुळे मार्चच्या सुरुवातीला आनंद व्यक्त केला असला तरी अखेर त्यांच्या कामांवर गदा आली आहे. बुधवारची रंगपंचमी ‘साजरी’ केल्यानंतर खाजगी बँकांना शुक्रवारची सुट्टी आहे; मात्र अनेक (रिझव्‍‌र्ह बँकेसह) राष्ट्रीयीकृत बँकांना शुक्रवारसह रविवारीही प्राप्तीकर भरणा सुविधेसाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यास बजावण्यात आले आहे. तर एरव्ही शनिवारी ‘हाफ डे’ असताना यंदा मात्र ३० मार्चला राष्ट्रीयीकृत बँकांसह खाजगी बँकांच्या कामकाजाच्या वेळा सायंकाळी ६ वाजेपर्यंत विस्तारण्यात आल्या आहेत. दुसरीकडे देशभरात १७ हजारांहून अधिक शाखा असलेल्या विविध ६४ क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या विविध मागण्यांसाठीच्या एक दिवसाच्या बंदसाठीही शनिवार हाच ‘मुहूर्त’ निवडण्यात आला आहे!
दरम्यान, नव्या वर्षांच्या सुरुवातीला मार्च २०१३ मधील वाहन विक्रीचे आकडे, महाग होणाऱ्या लोकप्रिय एसयूव्ही, एप्रिलपासून २० टक्क्यांनी महाग होणारा वाहन विमा हप्ता याची चुटपूट कायम असणार आहे. पोस्टाच्या विविध अल्पमुदतीच्या बचत योजनांवरील ताज्या कमी व्याजदराची अंमलबजावणीही नव्या वर्षांपासून होणार आहे. ‘सीटीएस-२०१०’ स्वरूपातील नव्या धनादेशांच्या अनिवार्यतेचा अंमल मात्र एप्रिल २०१३ ऐवजी आणखी चार महिन्यांसाठी (३१ जुलैपर्यंत) लांबविण्यात आला आहे, तोच काय तो सर्वसामान्यांना दिलासा..

वर्ष-दीड वर्षांत १४% परतावा शक्य : संजय डोंगरे
शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नेहमीच दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून पाहायला हवे. किमान वर्ष-दीड वर्षांसाठी १४ टक्क्यांच्या आसपासचा परताव्याचे लक्ष्य राखायला हरकत नाही. सद्यस्थितीत हेही नसे थोडके, असेच म्हणायला हवे. व्याजदराशी निगडित जसे – बँक, बांधकाम, वाहन तसेच माहिती तंत्रज्ञान, पोलाद, सिमेंट आदी क्षेत्रातील समभागांकडे भांडवली बाजारातील गुंतवणूक म्हणून अधिक लक्ष ठेवावयास हवे, असा यूटीआय म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक व कार्यकारी उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सामान्य गुंतवणूकदारांना सल्ला आहे.
भांडवली बाजारासाठी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प ‘नॉन इव्हेन्ट’ राहिला आहे. शेअर उलाढाल कर अर्थात ‘एसटीटी’मध्ये कपात करण्याच्या निर्णयाचे शेअर बाजारात स्वागत करण्यात आले असले तरी बाजारातील एकूण उलाढालीत (व्हॉल्यूम) तेव्हापासून घटच पाहायला मिळते. एकूणच गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाल्याचे हे द्योतकच आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून अर्थव्यवस्थाही फार काही वेगाने प्रवास करत नाहीय. अपेक्षित असलेला विकास दर ८-९ टक्क्यांऐवजी प्रत्यक्षात ६ टक्क्यांपर्यंत रोडावला आहे. विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू असली तरी त्याचे म्हणावे तसे फार अधिक प्रमाण नाही. त्या उलट स्थानिक संस्थागत गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मारा कायम आहे.
देशाला भेडसावत असलेल्या वित्तीय तुटीबरोबरच उद्योगांसह सामान्यांना हवी असलेली व्याजदर कपातीचे केवळ एक – दोन घाव उपयोगी ठरणारे नाहीत तर त्यातील सातत्य आगामी वर्षभर तरी रहायला हवे. दर तिमाहीत किमान पाव टक्का व्याजदर कपातच एकूण अर्थव्यवस्थेला लक्षणीय हातभार लावणारी ठरेल, असे संजय डोंगरे यांचे प्रतिपादन आहे.

गुंतवणूक आणि परतावा
समभाग    – ९.८६%
सोने    + १४.९७%
मुदत ठेवी    + ८.२८%
चलनवाढ    ६.८५% (सरासरी)
* जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१२ या कालावधीमधील परतावा

किंगफिशरच्या मालकीची सध्या १० विमाने आहेत. तर अन्य १५ विमाने ही भाडय़ाची आहेत. त्यांची अद्याप नोंदणी रद्द करण्यात आलेली नाही. यापूर्वी किंगफिशच्या ताफ्यातील १५ विमानांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
व्ही.पी. अगरवाल
विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष