केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आशावाद

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. लसीकरणाचा गाठलेला ऐतिहासिक टप्पा आणि सणोत्सवाच्या हंगामात वाढलेली मागणी हे घटक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीला चालना देतील. शिवाय रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या ऑक्टोबर महिन्याच्या मासिक आर्थिक अवलोकन अहवालाचा दावा आहे.

नजीकच्या काळात भारताची निर्यात कामगिरी आणखी सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे भारत येत्या काही वर्षांत जगातील प्रमुख देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील मत व्यक्त केले आहे.

‘आत्मनिर्भर भारत मोहिमे’सह सरकारने मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेल्या संरचनात्मक सुधारणांनी देशाच्या आर्थिक पुन:स्थापनेला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामुळे व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत आणि व्यवसायपूरक चालना मिळाली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक धोरणात्मक सुधारणांमुळे भारताच्या गुंतवणुकीचे चक्र पुन्हा कार्यरत झाले आहे. याच्या परिणामी जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आवश्यक पाया तयार झाला आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन, पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उद्योगांसाठी व्यवसायपूरक वातावरण आणि नियमांचे सुलभीकरण आणि उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना अशा सर्व धोरणात्मक सुधारणांमुळे उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली आहे. शिवाय करोनाकाळात वस्तू आणि सेवांना कमी झालेली मागणी पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. तसेच कमी व्याजदर आणि पुरेशा रोकड तरलतेमुळे मागणी वाढण्यास हातभार लागला, असे अर्थमंत्रालयाच्या अहवालाचे निरीक्षण आहे.

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या म्हणण्यानुसार, सणासुदीत वाढलेल्या ग्राहक उपभोगामुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये १.३ लाख कोटी रुपयांचे वस्तू आणि सेवाकराचे (जीएसटी) संकलन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर होत असल्यामुळे त्यातून अर्थव्यवस्थेच्या वाढीचे सुस्पष्ट संकेत मिळत आहेत.

वाढत्या महागाईची जोखीमही…

करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आलेले यश आणि वाढलेल्या व्यावसायिक आत्मविश्वासामुळे ऑक्टोबर महिन्यात अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे निदर्शानास येत आहे. मात्र जागतिक पातळीवर दीर्घकाळापासून पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या बाधा आणि उत्पादन घटकांच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढत असल्याने त्याचा विकासावर परिणाम होत आहे, असेही  त्यात म्हटले आहे.