मुंबई : सरलेल्या ऑगस्ट महिन्यात भारतातील ट्रॅक्टर उद्योगाने निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक गाठणारी कामगिरी केली. ऑगस्ट महिन्यात ११,७६० ट्रॅक्टरची देशातून निर्यात झाली. विद्यमान २०२१ सालात ओळीने तिसऱ्या महिन्यात ट्रॅक्टर निर्यातीने १० हजारांचा टप्पा पार केला आहे.

देशांतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात ट्रॅक्टरचे एकूण उत्पादन एक लाखाहून अधिक झाले. मात्र ऑगस्टमध्ये देशांतर्गत विक्री ५३,७२१ इतकी म्हणजे मागील वर्षाच्या ऑगस्टमधील ६४,७२९ आणि जुलै २०२१ मधील ६५,२१६ च्या तुलनेत लक्षणीय घसरली आहे. ट्रॅक्टर उत्पादकांनी केलेल्या दरवाढीचा परिणाम देशांतर्गत मागणीवर झाला असल्याचे विश्लेषकांचे मानणे आहे.

देशातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्र अँड महिंद्रच्या ऑगस्ट महिन्यातील देशांतर्गत विक्रीत १५ टक्क्यांची घसरण झाली असून ऑगस्ट २० मधील २३,५०३ ट्रॅक्टर्सच्या विक्रीच्या तुलनेत ऑगस्ट २०२१ मध्ये १९,९९७ युनिट्स विकले गेले. तर महिंद्रने ही उणीव ऑगस्टमध्ये ४३ टक्क्यांच्या वाढीसह १,३६३ ट्रॅक्टर्सची निर्यात करून भरून काढली आहे.

ट्रॅक्टर उत्पादकांची शिखर संघटना असलेल्या ‘ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन (टीएमए)’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यातील ट्रॅक्टर उत्पादन १,०५,४२२ झाले असून या कॅलेंडर वर्षातील हे सर्वाधिक उत्पादन आहे. २०२१ मध्ये मासिक ट्रॅक्टर उत्पादनाने एक लाखापेक्षा अधिक उत्पादन गाठल्याची ही तिसरी वेळ आहे.

ऑगस्ट महिन्यांतील देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीतील घसरण मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात नोंदलेल्या सर्वोच्च वृद्धीदराशी सुसंगत आहे. आगामी दिवसांत म्हणजे सणासुदीच्या मुहूर्तावर, पीक कापणीच्या हंगामात चांगली मागणी अपेक्षित असल्याचे महिंद्रच्या फार्म इक्विपमेंट विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी सांगितले.

गेल्या वर्षातील ऑगस्ट महिन्यांतील विक्रीशी चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यातील विक्रीशी तुलना करता येणार नाही. कारण मागील ऑगस्ट महिन्यातील विक्री ही आधीची पाच महिने सुरू राहिलेल्या टाळेबंदीमुळे साचत जात, नंतर खुली झाल्याने अकस्मात वाढ झालेली विक्री होती. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या एस्कॉट्र्सने ऑगस्ट महिन्यांत देशांतर्गत विक्रीत २७ टक्क्यांची घट नोंदवत ४,९२० युनिट्सची विक्री केली.

मुख्यत्वे सरकारी अनुदाने, पर्जन्यमान, जलाशयातील पाण्याच्या उपलब्धतेवर ट्रॅक्टर विक्री ठरत असते. या वर्षातील ट्रॅक्टर विक्रीने २८ टक्के वाढ नोंदविली असून समाधानकारक पावसामुळे जलाशयात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हाच कल उर्वरित वर्षात दिसून येण्याची ट्रॅक्टर उद्योगाला आशा आहे.