मुंबई : चिंताजनक रूप धारण करीत असलेल्या महागाईवर नियंत्रणासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ४० आधार बिंदूंची वाढ केल्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने रेपोदराशी संलग्न (‘ईबीएलआर’) कर्जाच्या व्याजदरात वाढ केली.

आयसीआयसीआय बँकेने ‘ईबीएलआर’ म्हणजेच बाह्य मानदंडावर बेतलेला व्याजदर ८.१० टक्के केला आहे. नवीन दरवाढ ४ मे २०२२ पासून लागू करण्यात आली आहे. तर बँक ऑफ बडोदाने तोच दर आता ६.९० टक्के केला आहे. परिणामी, बँकेकडून वितरित वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. हा दर ५ मेपासून लागू करण्यात आला आहे. हा दर मुख्यत्वे करून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर अवलंबून आणि रेपो दरातील फेरबदलानुसार परिवर्तित होत असतो.

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर सध्याच्या ४ टक्क्यांवरून, ४.४० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय तातडीच्या बैठकीअंती बुधवारी जाहीर केला. बँकांकडून वितरित होणाऱ्या कर्जाच्या व्याजदराला प्रभावित करणाऱ्या या प्रमुख दरातील वाढीमुळे, बँकांची कर्जे आता अधिक महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र तडाख्यांसह कर्जाच्या वाढलेल्या हप्तय़ांचा दुहेरी भार सोसावा लागेल.

गेल्या आठवडय़ात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) देखील अनुक्रमे ०.०५ टक्के आणि ०.१० टक्क्यांची वाढ केली. याचबरोबर खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक मिहद्र बँकेनेदेखील ‘एमसीएलआर’मध्ये प्रत्येकी ०.०५ टक्क्यांची वाढ केली होती.