scorecardresearch

बाजाराला अस्थिरतेचे ग्रहण!

जगभरात मध्यवर्ती बँकांद्वारे महागाईवर उतारा म्हणून व्याजदर आणखी वाढविले जाण्याच्या चिंतेमुळे गेल्या काही सत्रांपासून प्रमुख निर्देशांक डळमळलेले असताना, बाजारात शुक्रवारच्या व्यवहारांनी अस्थिरतेतच आठवडय़ाला निरोप दिला. 

बाजाराला अस्थिरतेचे ग्रहण!
( संग्रहित छायचित्र )

मुंबई : जगभरात मध्यवर्ती बँकांद्वारे महागाईवर उतारा म्हणून व्याजदर आणखी वाढविले जाण्याच्या चिंतेमुळे गेल्या काही सत्रांपासून प्रमुख निर्देशांक डळमळलेले असताना, बाजारात शुक्रवारच्या व्यवहारांनी अस्थिरतेतच आठवडय़ाला निरोप दिला. घसरणारा रुपया आणि परदेशी निधीचा ओघ आटल्यामुळे जोखीम वाढल्याचे संकेतही सप्ताहअखेरच्या सत्रातील या दिशाहीन व्यवहारांनी दिले. परिणामी शुक्रवारचे बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स केवळ ३६.७४ अंशांची भर घालून ५८,८०३.३३ वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये नाममात्र ३.३५ अंशांची घसरण होऊन तो १७,५३९.४५ वर स्थिरावला. सत्रादरम्यान दोन्ही निर्देशांकांची नफा-तोटा अर्थात चढ-उताराची आवर्तने निरंतर सुरू होती.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० समभागांमध्ये एचडीएफसीने सर्वाधिक १.७५ टक्क्यांची वाढ साधत अव्वल कामगिरी नोंदविली. त्यानंतर आयटीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक हे वधारलेले समभाग ठरले. तथापि, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, पॉवरग्रीड, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांमध्ये एका टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

अमेरिकेतील रोजगारासंबंधी जाहीर होऊ घातलेली आकडेवारी, त्या आधारे ठरू शकणारा फेडरल रिझव्‍‌र्हचा आगामी पवित्रा, तेल निर्यातदार राष्ट्रांच्या ओपेक प्लस संघटनेची बैठक आणि त्यापूर्वीच वाढलेल्या तेलाच्या किमती, वाढणारा डॉलर निर्देशांक आणि वाढत्या यूएस बॉण्डचा परतावा हे सारे घटक आगामी काळासंबंधी अनिश्चिततेत भर घालणारे व त्या परिणामी नजीकच्या काळात बाजारातील अस्थिरतेला खतपाणी घालणारे आहेत, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नमूद केले. त्यांच्या मते, वरील घटनांसंबंधाने जोवर स्पष्टता येत नाही, तोवर बाजारांचे दिशाहीन भरकटणे आणि ते विक्रीच्या दबावाखाली राहणे क्रमप्राप्त दिसते.

रुपयांत २६ पैसे घसरण

ल्ल अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी २६ पैशांनी घसरून ७९.८२ वर बंद झाला. डॉलरपुढे नांगी टाकणाऱ्या अन्य चलनांचे अनुकरण, त्याचप्रमाणे भांडवली बाजारात विक्री करून माघारी परतत असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांकडून  तसेच आयातदारांकडून  डॉलरची मागणी वाढल्याचाही रुपयाच्या मूल्यावर ताण दिसून आला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uncertainty capital market inflation central banks around world interest rate ysh