scorecardresearch

‘यूपीआय’ व्यवहारांची कोटीच्या कोटी उड्डाणे ; सप्टेंबरमध्ये उलाढालीत ११ लाख कोटींचा विक्रमी टप्पा

चालू वर्षांत मे महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

‘यूपीआय’ व्यवहारांची कोटीच्या कोटी उड्डाणे ; सप्टेंबरमध्ये उलाढालीत ११ लाख कोटींचा विक्रमी टप्पा
ऑनलाइन पेमेंट पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झालेत, आता काळजी करू नका(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली,: नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ११ लाख कोटी रुपये मूल्याचे तब्बल ६७८ कोटींहून अधिक व्यवहार पार पडले, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने मंगळवारी दिली.

चालू वर्षांत मे महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात ६५७.९ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून १०.७२ लाख कोटी मूल्याचे व्यवहार पार पडले. तर सरलेल्या महिन्यात प्रथमच ११ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला गेला. सध्या यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. रोकडरहित अर्थात कॅशलेस अर्थव्यवस्था बनण्यामागे यूपीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारांचे मूल्य मे महिन्याच्या १०,४१,५०६ कोटी रुपयांवरून, १०,१४,३८४ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले होते. जुलैमध्ये पुन्हा त्यात वाढ होऊन ते १०,६२,७४७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर पोहोचले. आता सणोत्सवाचा हंगाम असल्याने चालू ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये व्यवहारांचे नवीन विक्रम प्रस्थापित होणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या