मुंबई : वेगवेगळे अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषकांनी चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीसाठी सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये वाढीचा दर हा १३ ते २३ टक्क्य़ांपर्यंतच्या उच्च राहण्याचे कयास व्यक्त केले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेल्या या तिमाहीतील अर्थव्यवस्थेच्या वाढीची अधिकृत आकडेवारी महिनाअखेर जाहीर केली जाणे अपेक्षित आहे.

देशाचे माजी मुख्य सांख्यिकी प्रणब सेन यांनी तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर १७ ते १८ टक्क्यांदरम्यान राहील, असे म्हटले आहे. तर केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते हा दर १३.१ टक्के पातळीवर राहील. विविध तज्ज्ञ अनुमानांपैकी हा सर्वात कमी वर्तविला गेलेला अंदाज असून, त्यामागेही गेल्या वर्षांच्या उणे स्थितीत असलेल्या दराच्या तुलनेत यंदा ही वाढ झालेली दिसू शकेल, असे सबनवीस यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी करोना उद्रेकाच्या तोंडावर उणे २४.४ टक्के दराने आक्रसून भारताच्या अर्थव्यवस्थेची भीषण अधोगती झाल्याचे आढळून आले होते. तर यंदाही करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जून महिन्यात अनेक भागातील टाळेबंदीमुळे अर्थचक्र प्रभावित झाले होते, याकडे सबनवीस यांनी लक्ष वेधले आहे.

‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने मंगळवारी जाहीर केलेल्या विश्लेषण अहवालात, जीडीपी वाढीचा दर हा २० टक्के राहण्याचा कयास व्यक्त केला आहे. इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांच्या मते, हा उच्च भासणारा दर प्रत्यक्षात ‘फसवा’ आहे आणि तो अलीकडच्या महिन्यांत वाढलेल्या अप्रत्यक्ष कराच्या (वस्तू व सेवा कर) संकलनाच्या आकडय़ांना भुलून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून निर्धारित केला जाऊ शकेल. गेल्या वर्षांतील तिमाहीत जीडीपीच्या २४ टक्क्य़ांपर्यंत झालेल्या संकोचाच्या तुलनेत ही इतकी वाढ दिसणे स्वाभाविकच आहे. प्रत्यक्षात त्यामुळे यंदाच्या दुसऱ्या लाटेतून साधलेल्या विपरीत प्रभावाला काही अंशी झाकले जाईल, इतकेच समाधान ही आकडेवारी मिळवून देईल, असे त्यांनी मत व्यक्त केले.

रिझव्‍‌र्ह बँकेने ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या पतधोरण आढाव्याच्या बैठकीनंतर, प्रस्तुत केलेल्या सुधारित अनुमानानुसार एप्रिल-जून २०२१ तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा दर २१.४ टक्के राहील, असे म्हटले आहे. पीडब्ल्यूसी इंडियाचे रॅनेन बॅनर्जी यांच्या मते हा दर २२ टक्क्य़ांच्या घरात जाऊ शकेल. त्यांच्या मते, करोनापूर्व पातळीपर्यंत अर्थव्यवस्था जवळपास सावरली असल्याचे यातून दिसून येईल. क्वांट-इको रिसर्चच्या डॉ. शुभदा राव यांनी, एकूण सर्व अनुमानांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २३ टक्के दराने जीडीपी वाढीचा कयास सरलेल्या तिमाहीसाठी व्यक्त केला आहे.

वेगवेगळ्या अनुमानांवर दृष्टिक्षेप..

केअर रेटिंग्ज    १३.१ टक्के

बार्कलेज        १४.९ टक्के

इंडिया रेटिंग्ज    १५.३ टक्के

डेलॉइट इंडिया   १७.७ ते २१.८ टक्के

एसबीआय ग्रुप   १८.० टक्के

क्रिसिल १९.० टक्के

इक्रा    २०.० टक्के

रिझव्‍‌र्ह बँक     २१.० टक्के

पीडब्ल्यूसी इंडिया २२ टक्के

क्वांटइको रिसर्च  २३ टक्के