संक्षिप्त व्यापार-वृत्त : एअर आशियावर महिला प्रतिनिधित्व; अमिशा सेठी मुख्य वाणिज्य अधिकारी

देशांतर्गत स्वस्तातील हवाई प्रवास देऊ पाहणाऱ्या एअर आशिया इंडियाला जबाबदार व्यक्ती म्हणून एक महिला प्रतिनिधी मिळाली आहे. विपणन क्षेत्रातील दशकभराचा अनुभव असलेल्या अमिशा सेठी यांची कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देशांतर्गत स्वस्तातील हवाई प्रवास देऊ पाहणाऱ्या एअर आशिया इंडियाला जबाबदार व्यक्ती म्हणून एक महिला प्रतिनिधी मिळाली आहे. विपणन क्षेत्रातील दशकभराचा अनुभव असलेल्या अमिशा सेठी यांची कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटाच्या रूपात दुसरा मोठा भागीदार असणाऱ्या एअर आशियातील सेठी या यापूर्वी ब्लॅकबेरी तसेच एअरटेलसारख्या दूरसंचार कंपन्यांमध्ये कार्यरत होत्या. ब्लॅकबेरीच्या आशिया पॅसिफिक विभागाचे तसेच एअरटेलचे विपणन विभाग त्या हाताळत होत्या. मूळच्या मलेशियन कंपनी असलेल्या एअर आशियाच्या भारतातील व्यवसायप्रमुख म्हणून कंपनीने दोन महिन्यांपूर्वी मिट्टू शांडिल्य यांची नियुक्ती जाहीर केली, नंतर कंपनीच्या संचालक मंडळावर टाटा समूहातून सर्वाधिक चार सदस्य निवडण्यात आले होते. कंपनीचे मुख्य प्रवर्तक टोनी फर्नाडिस हे गेल्या आठवडय़ात भारत दौऱ्यावर असताना त्यांनी हवाई प्रवास सेवा व्यवसाय सुरळीत होण्याच्या दृष्टीने विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. रतन टाटाही या वेळी उपस्थित होते.
‘जेत्तिहाद’ सौदा तपास-जाळ्यात
जेट-इतिहाद हिस्सा विक्री व्यवहार तपासाच्या जाळ्यात फसत चालले आहे. याबाबत भाजप खासदाराने लिहिलेल्या पत्रानंतर केंद्रीय दक्षता आयोगाने केंद्रीय अन्वेषण विभागाला यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपचे झारखंडमधील प्रतिनिधित्व करणारे निशिकांत दुबे यांनी आयोगाला गेल्या आठवडय़ात लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत विभागाला जेट-इतिहादमधील समभाग हिस्सा खरेदीदरम्यान भारत व संयुक्त अरब अमिरात यांच्यामधील हवाई प्रवास वाहन वाटपाबाबत चार केंद्रीय मंत्र्यांनी आपले प्रत्यक्ष मत नोंदविले होते, असा आक्षेप या खासदाराने नोंदविला आहे. या व्यवहाराच्या वेळी अनेक नियम, अटींचा भंग करण्यात आल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. या व्यवहारात सरकारचा प्रत्यक्ष सहभाग राहिला असून केवळ अन्वेषण विभागच त्याची चौकशी करू शकतो, असेही दुबे यांनी म्हटले आहे.
गायब गुंतवणूकदार शोधण्यासाठी सेबी-सहारा सहकार्य
गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी ‘सेबी’ सहारा समूहाबरोबर सहकार्य करणार आहे. समूहातील दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेक दावेदार अद्याप समोर आले नसल्याने त्यांना शोधण्यासाठी सेबी पुढे आली असून तिला आवश्यक ते सारे सहकार्य देण्याची तयारी सहाराने दर्शविली आहे. अशा गुंतवणूकदारांची संख्या ३ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. समूहाने २४,००० कोटी रुपये देणे आहेत, असा सेबीचा दावा आहे. यावरून सेबीने सहाराला थेट सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत केल्याचा दावा करत समूहाने अनेक गुंतवणूकदार हे कायमस्वरूपी पत्त्यावर राहत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यावरूनही सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा व सहाराप्रमुख सुब्रतो रॉय यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. आपण सहकार्यास तयार असला तरी सेबी प्रतिसाद देत नसल्याचा रॉय यांचा सूर आहे.

शॉपर्स स्टॉपचे आता ठाण्यात दालन
फॅशन वस्त्रप्रावरणे व अ‍ॅक्सेसरीजसह घर-सजावटीच्या सामानाची नामांकित देशी व आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी विक्री-शृंखला ‘शॉपर्स स्टॉप’ने आपल्या ठाणे येथील नवीन दालनाचे मंगळवारी उद्घाटन केले. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये तब्बल ७५,००० चौरस फुटांवर विस्तारलेले हे शॉपर्स स्टॉपचे देशातील ६०वे दालन आहे. ठाण्यातील स्टोअरचे उद्घाटन मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिच्या हस्ते झाले. सिटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व क्रेडिट कार्ड्स व्यवसायाच्या प्रमुख मुगे युझुआक आणि शॉपर्स स्टॉप लिमिटेडचे उपाध्यक्ष (विपणन आणि लॉयल्टी) विनय भाटिया याप्रसंगी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Useful business short news

ताज्या बातम्या