वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘मेटा’ची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने मार्च महिन्यात १८ लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप खाती बंद केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा- २०२१ नुसार ही कारवाई करण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्चमध्ये २६.५७ टक्के अधिक कारवाई करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीला भारताकडून मार्च महिन्यात ५९७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींपैकी ४०७ तक्रारी व्हॉट्सअ‍ॅप खाती बंद करण्याविषयीच्या होत्या. त्यानुसार कंपनीने १८ लाख ०५,००० खात्यांवर बंदीची कुऱ्हाड चालवली. फेब्रुवारी महिन्यात १४ लाख २६,००० खात्यांवर बंदी आणण्यात आली होती.

मार्चमध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत २६.५७ टक्के अधिक खात्यांवर बंदी घालण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, अपशब्द, शिवीगाळ यांसारखे व्यवहार करणाऱ्या खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरून धमकी देणे, अश्लील संदेश पाठवणे यांसारख्या तक्रारींची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी गेल्या काही वर्षांपासून कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आधुनिक तंत्रज्ञान आदींत गुंतवणूक करीत आहे. १५ मे २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळात व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने दोन कोटी भारतीय खात्यांवर बंदी आणली आहे.

समाजमाध्यमांवर लक्ष

माहिती तंत्रज्ञान कायदा- २०२१ नुसार केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण खाते समाजमाध्यमांवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याच्या कारणाने केंद्र सरकारने नुकतीच यूटय़ूबवरील १६ वाहिन्यांवर बंदी घातली. या वाहिन्या राष्ट्र सुरक्षेला बाधा आणणारी माहिती प्रसारित करत होत्या.

धार्मिक ताणावर आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा या वाहिन्यांचा हेतू होता, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. या वाहिन्यांपैकी १० भारतातील होत्या, तर सहा पाकिस्तानातील होत्या. त्याशिवाय आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्याने एका फेसबुक खात्यावरही बंदी घातली. एप्रिल महिन्यातही केंद्राने २२ यूटय़ूब वाहिन्यांवर बंदी घातली. त्याशिवाय या महिन्यात तीन ट्वीटर हँडल, एक फेसबुक खाते आणि एका संकेतस्थळावर बंदी घालण्यात आली आहे.