गेल्या महिन्यात पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांचे दर तुलनेने कमी राहिले. या महिन्यात दर कपातही लागू करण्यात आली. त्याचबरोबर वाहन उद्योगाला दिली जाणारी उत्पादन शुल्कातील सवलतीपायी नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत कार विक्रीने पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे ही सवलत डिसेंबरनंतरही कायम राहावी, या वाहन उद्योगाच्या आशेने उचल घेतली आहे.
वाहन उद्योगाला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत दिली गेलेली उत्पादन शुल्क कपात सवलत नव्या वर्षांत मात्र कायम राहण्याची शक्यता दुरावली आहे. त्यातच अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी जानेवारीतील दरवाढ लागू करण्याचे घोषित केले आहे.
उत्पादन शुल्कातील कपात यापुढे राहण्याची शक्यता दुरावली असतानाच उद्योगाकडून व्याजदर कपातीचा तगादा लावला जात आहे. प्रगतीच्या प्रवासावर येऊ पाहणाऱ्या या उद्योगाला व्याजदर कपातीचा हातभार हवा, असे उत्पादकांची संघटना ‘सिआम’ला वाटते.
उत्पादन शुल्कातील सवलत नवा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत राहिल्यास आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची जोड मिळाल्यास वाहन उद्योग चालू आर्थिक वर्षांत वाढ नोंदवेल, असा विश्वास संघटनेचे महासंचालक विष्णू माथूर यांनी व्यक्त केला आहे.