आर्थिक मंदीचा फटका सहन करणाऱ्या देशातील वाहन उद्योगाला अखेर विक्री वाढीने हात दिला आहे. ऐन सण-समारंभाच्या मोसमात कंपन्यांची वाहन विक्री वाढली आहे.

ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्री ०.२८ टक्क्य़ांनी वाढून २,८५,०२७ वर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये वाहन विक्री २,८४,२२३ होती. सलग ११ महिन्यातील घसरणीनंतर देशातील वाहन विक्री वाढली आहे.

सण-समारंभातील मागणीला नव्या वाहनांची जोडही मिळाली आहे. सर्व गटातील वाहने मिळून मात्र वार्षिक तुलनेत १२.७६ टक्क्य़ांनी घसरून यंदाच्या ऑक्टोबरमध्ये २१,७६,१३६ पर्यंत आली आहे. वर्षभरापूर्वी या वाहनांची विक्री २४,९४,३४५ होती.

एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री २० टक्क्य़ांनी घसरली आहे.

ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत कार विक्री ६.३४ टक्क्य़ांनी घसरत १,७३,६४९ वर येऊन ठेपली. गेल्या ऑक्टोबरमध्ये ती १,८५,४०० होती. गेल्या महिन्यात बहुपयोगी वाहन विक्री मात्र २२.२२ टक्क्य़ांनी झेपावत १,००,७२५ पर्यंत पोहोचली. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती ८२,४१३ होती.